Vinesh Phogat : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विनेशबरोबरच कुस्तीपटू बजरंग पूनियाने (Bajrang Punia) काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. त्याआधी ते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भेटले, तेव्हाच विनेश (Vinesh Phogat) आणि बजरंग काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असा अंदाज लावला जात होता. विनेश आणि बजरंग हरियाणा विधानसभा 2024 साठी निवडणूक लढू शकतात. विनेशला हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिलं जाऊ शकतं. जुलाना हे विनेशचं सासर आहे. या मतदारसंघात सध्या दुष्यंत चौटालांचा पक्ष जेजेपीचा आमदार आहे.
विनेशने सोडली रेल्वेची नोकरी
काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधी विनेश फोगाटने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत विनेश फोगाटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विनेश फोगाट भारतीय रेल्वेत (Indian Railway) कामाला होती. रेल्वेत ती ओएसडी स्पोर्ट्स या पदावर होती. आपल्या पोस्टमध्ये विनेशने लिहिलंय 'भारतीय रेल्वेतील सेवा माझ्या आयुष्यातील एक यादगार आणि गौरवशाली टप्पा होता. आयुष्याच्या या वळणावर रेल्वे सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. राजीनामा भारतीय रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे, देशाच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने दिलेल्या संधीसाठी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन' असं विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
रेल्वेत किती होता पगार?
विनेश फोगाटने आपल्या पोस्टमध्ये राजीनाम्याचं कारण दिलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणासाठी आपण रेल्वेची नोकरी सोडत असल्याचं विनेशने सांगितलं आहे. विनेश ही रेल्वेत 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी' या पदावर कार्यरत होती. या पदासाठी मोठ्या पगाराची तरतूद आहे. रिपोर्टनुसार रेल्वेत 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी' या पदासाठी वार्षिक 15 ते 17 लाख रुपये पगार मिळतो.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी
विनेश फोगाटने नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दमदार कामगिरी केली होती. 50 किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण अंतिम फेरीच्या आधी झालेल्या वैद्यकीय चाचणीत विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त आढळल्याने तिला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं. यामुळे विनेशचं ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
विनेशची कु्स्ती कारकिर्द
विनेश फोगाटने देशासाठी आतापर्यंत कुस्तीत 15 पदकं जिंकली आहेत. यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमधल्या तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. एशियन गेम्समध्ये विनेशने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिच्या नावावर तीन सुवर्ण पदाकं जमा आहेत. एशियन चॅम्पियनशिपमध्ये विनेशने एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पटाकवली आहेत.