2019 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन सर्वाधिक वाढणार!

इंधनाचे वाढत चाललेले दर आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे.

Updated: Oct 7, 2018, 08:36 PM IST
2019 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन सर्वाधिक वाढणार! title=

मुंबई : इंधनाचे वाढत चाललेले दर आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे. त्रासलेल्या या जनतेसाठी दिलासादायक रिपोर्ट आला आहे. 2019 या वर्षात भारतातल्या कर्मचाऱ्यांचं वेतन सरासरी 10 टक्के वाढेल, अशी आकडेवारी विलिस टॉवर्स वॉटसननं दिली आहे. 2019 साली आशिया पॅसिफिक भागामध्ये भारतातच सर्वाधिक वेतनवाढ होईल, असं हा रिपोर्ट सांगतो आहे.

या सर्वेक्षणानुसार भारतात वेतनवाढ 10 टक्के दाखवण्यात आली आहे. भारताशिवाय इंडोनेशियामध्ये 8.3 टक्के, चीनमध्ये 6.9 टक्के, फिलिपिन्समध्ये 6 टक्के आणि हाँगकाँग सिंगापूरमध्ये 4 टक्के वेतनवाढ मिळेल.

भारताचा स्थिर आर्थिक विकास, प्रगतीशील सुधार आणि सगळ्या क्षेत्रांमधल्या आशावादामुळे भारतीयांची वेतनवाढ चांगली होईल, असा दावा विलिस टॉवर्स वॉटसन या संस्थेनं केला आहे.

या सर्वेक्षणानुसार मल्टीनॅशनल कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन देतील. केपीओ/बीपीओ आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 10 टक्के वेतनवाढीची शक्यता आहे.

फार्मा क्षेत्रात सर्वाधिक वेतनवाढ

2019 साली फार्मा क्षेत्रात सर्वाधिक 10.3 टक्के वेतनवाढ होईल. तर रिटेल क्षेत्रात 10 टक्के वेतनवाढ होईल. बँक, एनबीएफसी, विमा कंपन्या कर्मचाऱ्यांना 9.6 टक्के पगारवाढ देईल. 2017 साली ही पगारवाढ 9.1 टक्के एवढी होती.