Indian Railways : देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या भारतीय रेल्वेनं आजवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. सर्व आर्थिक वर्गांमधील प्रवाशांसाठी प्रवासाची सुविधा पुरवणाऱ्या या रेल्वे विभागाकडून देण्यात येणाऱ्य़ा या सुविधांचा उपभोग घेणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये काही गोष्टी अशाही आहेत ज्यांची तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं. कारण, यातून रेल्वे विभागातील विविधताही तुमच्या लक्षात येते.
रेल्वे प्रवासासाठी सर्वात गरजेची गोष्ट म्हणजे रेल्वेचं तिकीट. कारण, तिकीटाशिवाय तुम्ही रेल्वेमध्ये चढूच शकत नाही. इतकंच काय, तर बऱ्याचदा तिकीटाशिवाय फलाटावरही प्रवेश दिला जात नाही. अशा या भारतीय रेल्वेमध्ये एक स्थानक असं आहे, जिथं प्रवासी तिकीट काढतात खरं, पण कधी प्रवास मात्र करत नाहीत. यामागचं कारण तुम्हाला माहितीये?
तिकीट काढूनही प्रवासी प्रवास मात्र करत नाहीत, असं रेल्वे स्थानक आहे उत्तर प्रदेशामध्ये. प्रयागराजमध्ये असणाऱ्या या रेल्वे स्थानकाचं नाव आहे दयालपूर. इथं तिकीटासाठी पैसे खर्च केल्यानंतरही प्रवासी प्रवास करतच नाहीत, यामागचं कारण जाणून घेण्यासाठी भूतकाळात डोकावण्याची गरज भासते.
1954 मध्ये उत्तर प्रदेशातील हे रेल्वे स्थानक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्याशी संवाद साधत नेहरुंनी या स्थानकाच्या उभारणीची मागणी उचलून धरली होती. या रेल्वे स्थानकामुळं स्थानिकांचा प्रवास सुकर झाला. जवळपास 50 वर्षे इथं सर्वकाही सुरळीत होतं. पण, 2006 मध्ये काही कारणास्तव रेल्वेला हे स्थानक बंद करावं लागलं. या भागामध्ये तिकीटांचा कमी खप होणं, हे यामागचं मुख्य कारण होतं.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एखाद्या मुख्य रेल्वे मार्गावर स्थानक असल्यास तिथं दर दिवशी किमान 25 तिकिटांची विक्री होणं आवश्यक असतं. पण, दयालपूर रेल्वे स्थानकात असं घडताना दिसलं नाही. पुढे स्थानिक लोकनेत्यांच्या प्रयत्नांनी हे स्थानक 2020 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आलं आणि हे स्थानक पुन्हा बंद होऊ नये यासाठी नजीकच्या गावातील नागरिकांनी एक शक्कल लढवली.
इथं गावातील नागरिक आपआपल्या क्षमतेनुसार तिकीट खरेदी करत असतात. तिकीट खरेदीदर कायम ठेवण्यासाठी खटाटोप सुरू असतो. थोडक्यात हे गावकरी रेल्वेचं तिकीट खरेदी करतात, पण प्रवास मात्र करत नाहीत. स्थानिकांच्या मते इथं सध्या एकच रेल्वे थांबते. त्यात ही रेल्वेही बंद झाल्यास अडचणींमध्ये भर पडू शकते. दरम्यान, इथं आणखी रेल्वेचे थांबे देण्यात यावेत यासाठीसुद्धा स्थानिक आणि नजीकच्या गावांकडून रेल्वे प्रशासनाकडे तगादा लावला जात आहे.