रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त 'इतक्या' रुपयात

IRCTC Tour Package: भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने धार्मिक प्रवास करण्याची संधी देण्यात येत आहे. या प्रवासात तुम्हाला दिव्य 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळेणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 19, 2023, 09:12 PM IST
रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त 'इतक्या' रुपयात title=

IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. काय आहेत हे पॅकेज? यासाठी किती खर्च येईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

भारतीय रेल्वेकडून सात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून या दर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तुम्ही देखील हा प्लान आखत असाल तर पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. IRCTC ने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने धार्मिक प्रवास करण्याची संधी देण्यात येत आहे. या प्रवासात तुम्हाला दिव्य 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळेणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे 7 ज्योतिर्लिंग यात्रा असे या पॅकेजचे नाव आहे. ही यात्रा 17 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार आहे.

किती दिवसांचा असेल दौरा?

रेल्वेच्या या पॅकेजमध्ये 9 रात्री/10 दिवसांचे पॅकेज असेल. या पॅकेजमध्ये एकूण 767 बर्थ असतील. यात आराम वर्गाच्या 49 जागा असतील. याशिवाय स्टँडर्ड क्लासमध्ये 70 जागा आणि इकॉनॉमी क्लासमध्ये 648 जागा असतील.

कोणती ठिकाणे कव्हर केली जातील?
आयआरसीटीसीचे हे पॅकेज घेणाऱ्या भाविकांना गोरखापूर - ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, भेत द्वारका, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग - गोरखपूर असा प्रवास करता येणार आहे. 

किती येईल खर्च ?

आराम वर्गातील प्रवाशांना सेकंड एसी क्लासमध्ये प्रवास करावा लागेल. यामध्ये प्रवाशांना प्रति व्यक्ती 42 हजार 200 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याशिवाय स्टँडर्ड क्लासच्या प्रवाशांना थर्ड एसीमध्ये प्रवास करता येणार आहे. स्टॅंडर्ड क्लासच्या प्रवाशांना प्रति व्यक्ती 31 हजार 800 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना स्लीपर ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्याचे भाडे 18 हजार 950 रुपये प्रति व्यक्ती असेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला रेल्वेकडून ईएमआय पर्यायाची सुविधाही मिळत आहे. तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर पॅकेजची अधिक माहिती मिळू शकेल.