Indian Railway RPS Service: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 22 आणि 23 एप्रिल रोजी जवळपास साडेतीन तास रेल्वेची प्रवासी आरक्षण सेवा (PRS) काही कारणामुळे सुरु होणार नाही. या कालावधीत तुम्ही तिकीट काढू शकणार नाही. तिकीट आरक्षण होणार नसल्याने तुम्हाला प्रवास करता येणार नाही. तसेच या कालावधीत तुम्ही सीटचे ऑनलाइन बुकिंग, चार्टिंग, काउंटर चौकशी किंवा ईडीआय सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
आज 22 एप्रिल आणि उद्या 23 एप्रिल रोजी तुम्हाला 139 क्रमांकावर कॉल करुन ट्रेनच्या (Passenger Reservation System) ऑपरेशनशी संबंधित कोणतीही माहिती मिळू शकणार नाही, अशी माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. या दरम्यान तुम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनवर जाऊन कोणतेही तिकीट बुक करु शकत नाही किंवा रद्द करु शकत नाही. सुमारे साडेतीन तास त्रास सहन केल्यानंतर ही सुविधा पुन्हा पूर्ववत होणार आहे.
भारतीय रेल्वेची यंत्रणा अपडेट करण्यात येणार आहे. त्यामुळे काही तांत्रिक समस्या जाणवणार आहे. रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, डेटाबेस कॉम्प्रेशन अॅक्टिव्हिटी अपडेट केल्यामुळे PRS प्रणाली तात्पुरती विस्कळीत होईल. यामुळे दिल्ली PRS च्या सर्व सेवा 22 एप्रिल रोजी रात्री 11.45 ते 23 एप्रिल 2023 रोजी पहाटे 3.15 वाजेपर्यंत बंद राहतील. या 3.30 तासांमध्ये लोकांना चौकशी सेवा, आरक्षण, रद्द करणे, इंटरनेट बुकिंग आणि EDR सेवेचा लाभ घेता येणार नाही.
प्रत्येक रेल्वे स्थानकावर ऑफलाइन तिकीट बुक करण्यासाठी पीआरएस प्रणाली आहे. या प्रणालीच्या (Passenger Reservation System) मदतीने रेल्वे तिकीट व्यवस्था कार्य करते. यासोबतच रेल्वे स्थानकांवर आरक्षण, चौकशी यंत्रणा, रेल्वे तिकीट रद्द करणे आदी कामे केली जातात. कामाचा ताण वाढल्याने त्यावर आणखी बोजा वाढतो. त्यामुळे सिस्टीम धीमी होते. त्यामुळे वेळोवेळी PRS प्रणाली अपग्रेड करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. PRS प्रणालीच्या अपडेटनंतर, सेवा जलद होते आणि बुकिंगचा वेग वाढतो.