Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर

Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय... 

Updated: Jun 7, 2023, 08:39 AM IST
Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर  title=
Indian Railway travel kavach system safety norms and provisions know details

Odisha Train Accident : ओडिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर यंत्रणा आणि सरकारला खडबडून जाग आली. क्षणात होत्याचं नव्हतं करणाऱ्या या अपघातानंतर पुन्हा एकदा (Indian Railway) रेल्वे प्रवास आणि त्यादरम्यानच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दर दिवशी भारतामध्ये लाखोंच्या संख्येनं प्रवासी मुख्य माध्यम म्हणून रेल्वे मार्गाचा पर्याय निवडतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले रेल्वे अपघात पाहता आता प्रवाशांनाही त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली आहे. मुख्य म्हणजे अपघातानंतर समोर आलेले अहवाल, उपस्थित होणाऱ्या उच्चस्तरिय चौकशीच्या मागण्या या साऱ्यातूनच काही धक्कादायक आकडेवारीही समोर येत आहे. 

ओडिशा अपघातानंतर एकिकडे पंतप्रधानांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच घटनास्थळी भेट दिली. यानंतर रेल्वेरुळांची स्थिती, वेग झेलण्याची त्यांची क्षमता आणि रेल्वे गाड्यांची सुस्थिती याबाबतची बरीच माहिती समोर आली. शिवाय यामध्ये आणखी एक मुद्दाही अधोरेखित झाला. तो म्हणजे रेल कवच, अर्थात ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीमचा. 

रेल्वे गाडी रुळावरून उतरण्याच्या घटना नेमक्या किती? 

एका शासकीय अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार 2019- 20 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये 70 टक्के घटना या रेल्वे, रुळांवरून उतरल्यामुळं झाल्या होत्या. त्याआधीच्या वर्षात हा आकडा 68 टक्के इतका होता. 

राहिला मुद्दा रेल्वेकडून सुरक्षिततेवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा, तर 2017-18 आणि 2021-22 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर, फेब्रुवारी 2022- 23 दरम्यानच्या काळात रेल्वे रुळांच्या डागडुजीसाठीच्या खर्चात सातत्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 

रेल्वे गाड्या आणि रुळांच्या दुरुस्तीसाठी कोणत्या वर्षात किती खर्च? 

2017- 18 मध्ये 8884 कोटी रुपये खर्च 
2020- 21 मध्ये 13522 कोटी रुपये 
2021- 22 मध्ये 16558 कोटी रुपये 
एकूण खर्चाची आकडेवारी 58048 कोटी रुपये 

अहवालातील माहितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही 

2017 ते 2021 दरम्यान रेल्वे गाड्या रुळांवरून उतरणं आणि तत्सम घटनांच्या धर्तीवर करण्यात आलेल्या चौकशीनंतर केंद्राच्या ऑडिटरकडून एक अहवाल सादर करण्यात आला होता ज्यामध्ये काही चिंताजनक गोष्टींचीही नोंद पाहायला मिळाली होती. यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुळांची दूरवस्था आणि त्यांच्या नोंदणीमध्ये झालेली लक्षणीय घट.  

हेसुद्धा वाचा : Odisha Train Accident: बालासोर रेल्वे दुर्घटनेवेळी रेल्वे क्रॉसिंगवर...; साक्षीदाराचा धक्कादायक दावा

रेल्वे रुळांची एकूणच परिस्थिती हे रेल्वेगाड्या रुळांवरून उतरण्याचं एक कारण, तर, रुळांना प्रमाणाहून जास्त वळणं असल्यामुळंही अपघात झाल्याची बाब समोर आली. रेल्वे रुळावरून उतरण्याच्या 180 घटनांमध्ये काही तांत्रिक कारणं कारणीभूत ठरली, तर एक तृतीयांशाहून अधिक दुर्घटना मालगाड्या किंवा रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये असणाऱ्या दूरवस्थेमुळं घडल्या होत्या. इतकंच नव्हे, तर रेल्वे चालवण्याची चुकीची पद्धत किंवा बऱ्याचदा निर्धारित वेगमर्यादेहून जास्त वेगानं रेल्वे चालवल्यामुळंही अशा प्रकारचे अपघात ओढावल्याची माहिती अहवालातून समोर आली. 

या साऱ्यामध्ये 'रेल कवच'चं महत्त्वं काय? 

ही एक अशी यंत्रणा आहे जी ‘ट्रेन कोलिजन अवॉइडेंस सिस्टम’ म्हणूनही ओळखली जाते. 2012 पासून ही यंत्रणा भारतात वापरात आली. या यंत्रणेअंतर्गत इंजिन आणि रुळांवर असणाऱ्या ओवर स्पिडींगवर नियंत्रण ठेवलं जातं. या प्रणालीमध्ये धोक्याची पूर्वसुचना मिळताच रेल्वेला ब्रेक मारता येतो.