Indian Railway Recruitment: सरकारी नोकरी मिळावी यासाठी तरूणांची धडपड सुरु असते. यासाठी वेळोवेळी सरकारकडून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. शैक्षणिक पात्रतेनुसार अर्जदार अर्ज करतात आणि नोकरीसाठी प्रयत्न करतात. आता रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील एका वर्षात 1,48,463 लोकांची भरती केली जाणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे. तर गेल्या 8 वर्षात दरवर्षी सरासरी 43,678 लोकांची भरती करण्यात आली आहे. पुढील 18 महिन्यांत विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10 लाख लोकांची भरती करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वेतन आणि भत्ता खर्च विभागाच्या नवीन वार्षिक अहवालानुसार, 1 मार्च 2020 पर्यंत पदांवर (केंद्रशासित प्रदेशांसह) नियमित केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 31.91 लाख होती. तर 40.78 लाख पदे मंजूर आहेत. जवळपास 21.75 टक्के पदे रिक्त होती. अहवालात असे म्हटले आहे की एकूण मनुष्यबळांपैकी सुमारे 92 टक्के मनुष्यबळ पाच प्रमुख मंत्रालये किंवा विभागांतर्गत येतात. यात रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह, पोस्ट आणि महसूल यांचा समावेश आहे.
एकूण 31.33 लाख लोकसंख्येपैकी (केंद्रशासित प्रदेश वगळून) रेल्वेचा वाटा 40.55 टक्के आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर विविध विभाग आणि मंत्रालयांना रिक्त पदांचा तपशील तयार करण्यास सांगितले होते आणि एकूण आढावा घेतल्यानंतर 10 लाख लोकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे, गेल्या सहा वर्षांत 72,000 हून अधिक पदे रद्द केली आहेत. ही सर्व गट क आणि डी पदे आहेत जी तंत्रज्ञानामुळे आता वापरात नाहीत आणि भविष्यात भरतीसाठी उपलब्ध होणार नाहीत. सध्या अशा पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या विविध विभागात पाठवले जाण्याची शक्यता आहे.