Climate Change : जागतिक तापमानवाढ, अनियमित पर्जन्यमान, ओला आणि सुका दुष्काळ, वादळ, चक्रीवादळ, पूर या आणि अशा अनेक संकटांनी सध्या संपूर्ण जगाला विळखा बसला आहे. इतकंच नव्हे, तर भारतातही वर्षागणिक येणारी चक्रिवादळं आणि तत्सम घटनांचा आकडा वाढत असल्यामुळं आता जागतिक स्तरावर होणारे हवामान बदल आणि त्याचे भारतासह इतरही देशांवर होणारे परिणाम याचा अनेक संघटना गांभीर्यानं विचार करू लागल्या आहेत.
जगापुढं असणारं संकट कसं टाळता येईल यासाठी महतत्वाची पावलं सातत्यानं उचलली जात आहेत. त्यातच आयआयटी मद्रास (IIT Madras) च्या एका निरिक्षणपर अभ्यासाला मोठं यश लाभल आहे. IIT Madras नुसार हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील मोठ्या क्षेत्राचा वापर कार्बन डायऑक्साईड सिंक म्हणून करता येऊ शकतो. थोडक्यात इथं कार्बन डायऑक्साईडचा साठा केला जाऊ शकतो, ज्यामुळं जगातील जवळपास सर्व देशांना हवामान बदलांच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे.
सदर शैक्षणिक संस्थेशी संलग्न असणाऱ्या तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये कार्बन डायऑक्साईडचा साठा करण्यासाठी कार्बन सक्वीट्रेशन (carbon sequestration) या तंत्राचा वापर केला जाऊ शकतो. या तंत्रामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होऊ त्याचा सकारात्मक परिणाम जागतिक तापमानवाढीमध्ये होणारी घट पाहता लक्षात येईल.
सरकारच्या उच्चस्तरिय समितीनुसार जागतिक स्तरावर हवामान बदलांशी लढा द्यायचा झाल्यास वातावरणातील किमान 100 बिलियन ते 1 ट्रिलियन टन इतका मोठा कार्बन डायऑक्साईडचा साठा कमी केला जाण्याची गरज असून, जास्तीत जास्त वृक्षलागवड हा त्यावरील एक उपाय ठरू शकतो.
आयआयटी मद्रासच्या निरीक्षणानुसार हे कार्बन डायऑक्साईड समुद्रात साधारण 500 मीटरपर्यंतच्या खोलीवर साठवला जाऊ शकतो. इथं तो स्थायू रुपात हायड्रेट करून साठवता येणं शक्य असून, त्यामुळं समुद्राला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असं सांगण्यात येत आहे.
या निरिक्षणाचे लेखक प्रा. जितेंद्र सांगवई यांच्या माहिनुसार समुद्रात लाखो वर्षांपासून मिथेन हायड्रेट्स साठवली जात आहेत. यातूनच समुद्राच्या उदरात कार्बनचेही साठे ठेवणं शक्य असल्याची बाब यावेळी स्पष्ट झाली.