'एअरस्ट्राईक'साठी बालाकोटची निवड का? अशी होती रणनीती...

या हल्ल्यासाठी बालाकोटचीच निवड करण्यात आली, त्यामागेही भारतीय वायुदलाची रणनीती होती... 

Updated: Feb 26, 2019, 12:55 PM IST
'एअरस्ट्राईक'साठी बालाकोटची निवड का? अशी होती रणनीती...   title=

नवी दिल्ली : मंगळवारी पहाटे भारताकडून पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करण्यात आला. 'मिराज २०००' या लढाऊ विमानांच्या सहाय्यानं १००० किलो स्फोटकांचा वापर करून 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळाला भारतीय वायुसेनेनं निशाणा बनवलं. परदेश सचिव विजय गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं केलेल्या या हल्ल्यात 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर हादेखील ठार झालाय. जम्मू-काश्मीरच्या पुलमवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर पाकिस्तान समर्थित 'जैश ए मोहम्मद'कडून दहशतवादी हल्ले करण्यात आले होते... या आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली.  भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून सीमारेषेपलिकडील दहशतवादी तळांचा नायनाट केलाय. जवळपास १००० किलो स्फोटकांचा (payload) वापर या हल्ल्यात करण्यात आला.

या हल्ल्यात बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय वायुदलाने हा हल्ला केला. या हल्ल्यात कोणत्याही सामान्य नागरिकाला हानी पोहचणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली होती. पण, या हल्ल्यासाठी बालाकोटचीच निवड करण्यात आली, त्यामागेही भारतीय वायुदलाची रणनीती होती...

हल्ल्यासाठी बालाकोटचीच निवड का?

'तालिबान'च्या खात्म्यानंतर 'जैश ए मोहम्मद'नं आपला कॅम्प बालाकोटमध्ये हलवला होता. २००० - २००१ साली बालाकोटमध्ये जैशनं आपले दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बनवले होते. 'अल रहमान ट्रस्ट' नावानं जैश ए मोहम्मदचीच आणखी एक संघटना या भागात दहशतवादी कारवायांत सहभागी आहे. बालाकोटपासून अडीचशे किलोमीटर दूर अंतरावर पेशावरमध्येही जैश ए मोहम्मदचे अनेक कॅम्प आहेत. 

बालाकोटपासून ४० किलोमीटर दूर पाकिस्तान अधिकृत काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्येही जैश ए मोहम्मदचे अनेक कॅम्प आहेत. त्यामुळेच बालाकोट हा भाग 'जिहादचा केंद्रबिंदू' (epicentre of jihad) म्हणून ओळखला जातो. दहशतवादी कारवाया पाहता बालाकोट हा भाग गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेच्याही रडारवर होता. त्यामुळे याच भागावर एअरस्ट्राईक करण्याचा निर्णय भारतीय वायुदलानं घेतला.

१२ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी रोजी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी 'जैश ए मोहम्मद'नं स्वीकारली होती.