मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. धवनला वगळून मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्या आणि इशांत शर्मा हे दोघेही जायबंदी असल्याने त्यांचा या निवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही. वेस्ट इंडिज संघाच्या भारत दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोंबरपासून दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
निवड समितीने सध्या खराब कामगिरी करणाऱ्या शिखर धवन, मुरली विजय आणि इशांत शर्मा यांना संघातून वगळले आहे. अपेक्षेप्रमाणे पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पहिला सामना ४ ऑक्टोंबरपासून राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १२ ऑक्टोंबरपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु होईल.
विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पूजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हनुमान विहारी, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.