नवी दिल्ली : भारतानं इराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. इराणमधून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत. मात्र हे देशाच्या हिताचा विचार करता हे निर्बंध झुगारून इराणमधून तेल आयात करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे.
भारतातील दोन सरकारी तेल कंपन्यांनी इराणकडं नोव्हेंबरमधील तेलासाठीची मागणी नोंदवलीय. ४ नोव्हेंबरपासून इराणचे सर्व आर्थिक व्यवहाराचे मार्ग बंद होतील. त्यामुळं इराणला अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करता येणार नाही. मात्र इराणनं भारतीय रुपयाच्या बदल्यात तेल देण्याचं कबूल केल्यामुळं भारतासाठी हा व्यवहार अधिक सोयीचा आणि स्वस्तातला ठरणार आहे.
इराणकडून भारताने इंधन खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने निर्बंध घातले होते. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी निर्बंध असूनही भारत इंधन खरेदी करेल असा विश्वास व्यक्त केला होता. दोन्ही देशातील आर्थिक सहकार्याचे धोरण यापुढेही सुरुच राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भेट घेतली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र करारातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणवर निर्बंध घालण्यात आले होते. अमेरिकेने इराणकडून तेल आयात करणास मनाई केली होती.
भारत हा इराणकडून तेल खरेदी करणारा सर्वांत मोठा देश आहे. भारताने इराणकडून तेल आयात वाढवण्याचा निर्णय देखील घेतला होता. इराणननेही भारताला आर्थिक व्यवहारात मोठी सूट देण्याची ग्वाही दिली होती.