Beti Bachao Beti Padhao : मध्यप्रदेशमधल्या धार जिल्ह्यातील ब्रम्हकुंडी इथल्या एका सरकारी शाळेत महिला आणि बाल विकास राज्य मंत्री सावित्री ठाकूर (Savitri Thackur) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सावित्री ठाकूर यांचं शिक्षक्ष बारावीपर्यंत झालं आहे. शाळेतील या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनी विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारल्या. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून एका फळ्यावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) हा मोदी सरकारचा संदेश लिहायचा होता. पण बराच वेळ विचार केल्यानंतरही सावित्री ठाकूर यांना हे चार शब्द लिहिता आले नाहीत.
काय लिहिलं सावित्री ठाकूर यांनी?
सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government) पालक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात आहे. पण या योजनांना मोदी सरकारमधल्याच मंत्र्यांकडून हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. सावित्री ठाकूर यांना फळ्यावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अस लिहायचं होतं. पण याऐवजी त्यांनी चक्क 'बेढी पड़ाओ बच्चाव' इसं लिहिलं. सावित्री ठाकूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.
काँग्रेसने साधला निशाणा
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने खिल्ली उडवत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ता केके मिश्रा यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत याला 'देशाचे दुर्दैव समजावं की लोकशाहीची मजबुरी' असं म्हटलं आहे. तसंच देशाची राज्यघटना कि आपलं शिक्षण धोरण याला जबाबदार आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
भाजपाचा पलटवार
काँग्रेसने निशाणा साधल्यावर भाजपनेही पलटवार केला आहे. 'काँग्रेसच्या राजवटीत आदिवासी मुली कोणत्या परिस्थितीत शिकू शकल्या याचा विचार करा! जे तुमच्या राहुलला करता आलx नाही, ते या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलीने करून दाखवलं आहे. बिकट परिस्थितीत आणि गरिबीत तिने बारावीपर्यंत शिक्षण तर घेतले, पण संघर्षही केला. आज त्या भाजपकडून देशाच्या महिला बाल विकास मंत्री झाल्या आहेत. त्यांनी खडतर आयुष्य जगणाऱ्या सर्व मुली आणि महिलांना मदत करण्याचं वचन दिलं आहे, असं भाजप प्रवक्ता डॉ. हितेश बाजपेयी यांनी म्हटलंय.
काँग्रेसने आदिवासी महिलांचा अपमान करण्याची शपथ घेतली आहे. हा समाज गरीब आणि महिला विरोधी मानसिकतेला कधी माफ करणार नाही असा हल्लोबलाही भाजपने केला आहे.