कोरोना : इराणमध्ये अडकलेल्या ५३ नागरिकांची सुटका

युरोपीय देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना देखील भारतात आणलं 

Updated: Mar 16, 2020, 07:55 AM IST
कोरोना : इराणमध्ये अडकलेल्या ५३ नागरिकांची सुटका title=

मुंबई : इराणची राजधानी तेहरानमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे तब्बल ५३ भारतीय नागरिक अडकले होते. यांना एअरलिफ्ट करून पुन्हा भारतात आणण्यात आलं आहे. या भारतीयांमध्ये ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. या भारतीयांना एअरलाइन्सच्या विशेष विमानातू भारतात आणण्यात आले आहे. इराणमधून भारतात आलेल्या या प्रवाशांचे विमान रात्री ३ वाजून  १० मिनिटांनी दिल्ली एअरपोर्टवर उतरले. 

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.जयशंकर यांनी इराणमधून या ५३ भारतीयांना एअरलिफ्ट केल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांची चौथी टीम इराणच्या तेहरान आणि शिराजमधून भारतात पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ३८९ भारतीयांना इराणमधून परत आणण्यात आलं आहे. याकरता परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

या ५३ प्रवाशांना विमानतळावर येताच आयसोलेशन विभागात पाठवण्यात आलं आहे. प्रथम त्यांच्या कोरोना व्हायरशीसंबंधित महत्वाच्या चाचण्या करण्यात येतील. त्यानंतरच त्यांना सोडण्यात येणार आहे.

यानंतर पहाटे ४.३०  वाजता युरोपीय देशांमध्ये अडकलेल्या ४४ भारतीय नागरिकांना दिल्लीत आणण्यात आलं. एम्स्टर्डममधून KLM DUTCH या एअरलाइन्सद्वारे दिल्लीत आणण्यात आलं. एअरपोर्टवरून यांना सुरक्षित छतरपुर येथील आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं.