नवी दिल्ली : देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुक्रवारी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील कोरोना महामारीचं संकट आणि शेजारी राष्ट्रांकडून होणारं दु:साहस यावर वक्तव्य केलं. शिवाय अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मुद्दा अधोरेखित करत राष्ट्रपतींनी प्रगतीपथावर असणाऱ्या देशाचा आढावा घेतला. राष्ट्रपतींच्या याच संबोधनपर भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे ....
- स्वतंत्र भारताच्या पायावरच आधुनिक भारत साकारला जात आहे. महात्मा गांधी आपले मार्गदर्शक असणं ही तर भाग्याची बाब.
- समानता हा आपल्या लोकशाहीचा मूळमंत्र आहे. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीनं साऱ्या विश्वाला पोहोचवलेली हानी पाहता देशात स्वातंत्र दिनी धामधूम नसेल.
- कोरोना योद्ध्यांनी या परिस्थितीला मोठ्या धीरानं तोंड दिलं. दुर्दैवानं कोरोनाशी लढताना काहींना आपले प्राण गमवावे लागले. देश त्या सर्व परिचारीका, डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा ऋणी राहील.
- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरुवात करुन सरकारनं करोडो नागरिकांना मदत केली. जनहितासाठी राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली गेली.
- सामर्थ्य आणि विश्वासाच्या बळावर कोविड १९ विरोधातील लढाईमध्ये अन्य राष्ट्रांनाही आपण मदतीचा हात दिला. काही राष्ट्रांना औषधांचा पुरवठा करत आपण हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की भारत संकटसमयी विश्वसमुदायासमवेत उभा आहे.
- देशाच्या संरक्षणार्थ आपल्या शूर जवानांनी त्यांच्या प्राणांची आहूती दिली. सारा देश गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या या वीरांपुढं नतमस्तक आहे. त्यांचा ऋणी आहे.
- देशाचा विश्वास हा शांततेत आहे. पण, कोणीही देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर देण्यात येईल. आम्हाला आमच्या सशस्त्र संरक्षण दलांचा अभिमान आहे.
- २०२० या वर्षानं महत्त्वाची शिकवण दिली. निसर्ग मानवाच्या अधीन आहे हा समज मोडकळीस निघाला. २१ व्या शतकाकडे असा काळ म्हणून पाहिलं गेलं पाहिजे जेव्हा मानवानं मतभेद दूर करत धरणीमातेच्या संरक्षणार्थ एकजुटीनं प्रयत्न केले.
We have learnt some tough lessons in the year 2020. The invisible virus has demolished the illusion that human being is the master of nature. I believe, it is still not too late for humanity to correct its course and live in harmony with nature: President Ram Nath Kovind pic.twitter.com/4jZvPryLmg
— ANI (@ANI) August 14, 2020
आरोग्य क्षेत्रापासून देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि सद्यस्थितीचा आढावा घेत राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच देशातील तरुण पिढीचं भवितव्य उज्ज्वल आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.