मुंबई : थंडीशी संबंधित काहीसा दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या दोन ते चार दिवसांत थंडीची लाट आणि थंडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.
IMD ने म्हटलं आहे की, वायव्य आणि मध्य भारतात थंडीची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतात 2-4 फेब्रुवारीपर्यंत पाऊस सुरू राहील. वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांश भागात 2 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान 3-5 अंश सेल्सिअसने वाढण्याची व त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 15-25 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग वाहण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, 2 फेब्रुवारीपासून दिल्लीतील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारी रोजी ढगाळ आणि 3-4 फेब्रुवारी रोजी हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील. किमान तापमानात 8 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान चढ-उतार होईल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 5.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. 1 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत सकाळी धुक्यासह आकाश साफ राहील, असं आयएमडीने म्हटलंय.