नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली 'फादर ऑफ इंडिया' ही उपाधी ज्यांना अभिमानास्पद वाटत नसेल त्यांनी स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ नये, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या टपाल खात्याच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, अमेरिकेच्या यापूर्वीच्या कोणत्याही अध्यक्षाने भारताच्या पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीने उल्लेख केल्याचे दाखले किंवा पुरावे सापडत नाहीत. बाहेरच्या एखाद्या व्यक्तीकडून इतक्या मोकळेपणाने आणि निपक्षपातीपणे पंतप्रधान मोदी यांना उपाधी दिली जात असेल तर राजकीय विचारसरणी बाजूला सारून एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा.
परंतु, याचा अभिमान वाटत नसणाऱ्यांना स्वत:ला भारतीय म्हणवून घ्यायचा हक्क नाही, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले.
भूतकाळात जगभरात भारताला क्वचितच जो सन्मान मिळत होता, तो सन्मान आता मिळतो आहे. भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येकाला आज भारतीय असल्याचा विशेष अभिमान वाटतो आहे. पंतप्रधान मोदी यांचे कार्य आणि कर्तृत्व यांच्यामुळेच आज हे घडते आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना भारताचे राष्ट्रपिता म्हणणे अगदी योग्य आणि समर्पक असल्याचेही यावेळी जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. मोदी हे महान व्यक्ती आणि महान नेते आहेत. मला आठवत आहे की, भारताची परिस्थिती खूपच बिकट होती. देशात खूप वाद होते. परंतु, मोदींनी सगळ्यांना एकत्र घेऊन वाटचाल केली. एका पित्याप्रमाणे त्यांना सर्वांना एकत्र घेतले. त्यामुळे मोदींना 'फादर ऑफ इंडिया' म्हणावे लागेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.