पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले

इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा.

Updated: Sep 14, 2019, 08:29 AM IST
पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले title=

नवी दिल्ली: पाकिस्तानला स्वत:चे भले करून घ्यायचे असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यायला हवा, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी चंदीगढ येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, पाकला स्वत:चे भले हवे असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आम्हाला देऊन टाकावा. इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील आणि त्यांना भविष्यात युद्ध नको असेल तर त्यांनी हे पाऊल उचलायला हवे, असे रामदास आठवले यांनी म्हटले. 

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानात राहायचे नाही. त्यांना भारताचा भाग होण्याची इच्छा असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरच्या एक तृतीयांश भुभागावर अवैधरित्या कब्जा करून ठेवला आहे. हा भूभाग भारताच्या मालकीचा आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारकडून काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर भाजपच्या नेत्यांकडून पाकव्याप्त काश्मीरवर सातत्याने दावा केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात समाविष्ट करणे हा आमचा पुढचा अजेंडा आहे. कारण, हा भूभाग भारताचे अविभाज्य अंग आहे. ही केवळ माझी किंवा भाजपची इच्छा नाही. १९९१मध्ये सत्तेत असलेल्या नरसिंह राव सरकारचीही अशीच इच्छा होती, असा दावा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला होता.