मी अंधारात लढतोय, मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

२५ एप्रिल रोजी केंद्रीय प्रशासकीय लवादानं (CAT) मोहम्मद मोहसीन यांच्या निलंबनाला स्थगिती दिलीय

Updated: Apr 27, 2019, 01:37 PM IST
मी अंधारात लढतोय, मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती केल्याप्रकरणी कारवाईला सामारे जावं लागलेल्या अधिकाऱ्यानं उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मी केवळ माझं काम करत होतो... परंतु मला घाईघाईत निलंबित करण्यात आलं. यासंबंधात अजून मला एकही अहवाल मिळालेला नाही. मी अंधारात माझी लढाई लढतोय, असं मोहम्मद मोहसीन यांनी म्हटलंय. मोहम्मद मोहसीन हे कर्नाटकमधील १९९६ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचं पालन न करण्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलंय.

अधिक वाचा - मोदींच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती, दुसऱ्याच दिवशी आयएएस अधिकारी निलंबित

ओडीशा राज्यात संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यासाठी निवडणूक आयोगानं ओडिशाच्या 'जनरल पर्यवेक्षक' (Election General Observer) मोहम्मद मोहसीन यांना १७ एप्रिल रोजी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. निवडणूक आयोगानं त्यांच्याविरुद्ध अनुशासनात्मक कारवाई करण्याचे शिफारस केलीय. परंतु, २५ एप्रिल रोजी केंद्रीय प्रशासकीय लवादानं (CAT) मोहम्मद मोहसीन यांच्या निलंबनाला स्थगिती दिलीय. यानंतर या कारवाई विरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं मोहसीन यांनी म्हटलंय.

Image result for मोहम्मद मोहसिन
मोहम्मद मोहसिन

मोहम्मद यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचं कारण निवडणूक आयोगानं दिलंय. एसपीजी सुरक्षाप्राप्त व्यक्तींची तपासणी न करता कोणताही गैरप्रकार आढळल्यास निवडणूक आयोगाला केवळ माहिती व अहवाल देणे हेच मोहसीन यांचे काम होते... परस्पर तपासणी करण्याचे अधिकार त्यांना नाहीत, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र असा कोणताही नियम नसल्याचा आरोप केला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक आयोगाच्या एका टीमनं याआधी एका रोड शोसाठी राउरकेलामध्ये आलेल्या बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरचीही अशाप्रकारे झाडाझडती घेण्यात आली होती. पटनायक यांनी चौकशी करणाऱ्या टीमला पूर्ण सहकार्य केलं आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते हेलिकॉप्टरच्या आतच बसून राहिले.

मोहम्मद मोहसीन हे बिहारची राजधानी पाटणाचे रहिवासी आहेत. ते कर्नाटक सरकारमध्ये मागासवर्गीय कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.