आपल्यावर इतकं मोठं संकट येईल, असं वाटलं नव्हतं- मोदी

आपण सर्वांनीच आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण आजवर अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल. 

Updated: Jun 26, 2020, 01:15 PM IST
आपल्यावर इतकं मोठं संकट येईल, असं वाटलं नव्हतं- मोदी title=

नवी दिल्ली: जगावर कोरोनासारखं इतकं मोठं संकट येईल, याची कल्पना आपण कधी केली नव्हती, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शुक्रवारी 'आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियाना'च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मोदींनी म्हटले की, कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करत राहावा लागेल. देशावर आज इतके मोठे संकट आले असताना उत्तर प्रदेशने साहस आणि समज दाखवून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. ही गोष्ट अभूतपूर्व आणि प्रशंसनीय असल्याचे मोदींनी सांगितले.

आपण सर्वांनीच आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण आजवर अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल. मात्र, संपूर्ण जगावरच एवढे मोठे संकट येईल, याची कल्पना कधी केली नव्हती. हे असे संकट आहे की, जिथे लोक इच्छा असूनही एकमेकांची मदत करू शकत नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. तुर्तास यावर औषध एकच आहे, ते म्हणजे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे. मास्क परिधान करणे, चेहरा झाकणे हाच यावरचा उपाय आहे. कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत याच उपायांद्वारे आपण कोरोनाला रोखू शकतो, असे मोदींनी सांगितले. 

लॉकडाऊनमुळे देशाच्या शहरी भागांतील मजूर मोठ्याप्रमाणावर आपापल्या गावी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर योगी सरकारचे 'आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान' महत्त्वपूर्ण पाऊल ठरण्याची शक्यता आहे. या अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात १ कोटी २५ लाख रोजगार दिले जातील, असा योगी सरकारचा दावा आहे.