Viral Video: सार्वजनिक ठिकाणी अनेकदा गर्दीचा फायदा घेत तरुणी, महिलांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जातो. गर्दी असल्याने हे आरोपी हाताला लागत नाहीत आणि गुन्हा करुन मोकाट सुटतात. मात्र आता तंत्रज्ञानाचं युग असल्याने हे प्रकार मोबाईल कॅमेरा किंवा सीसीटीव्हीत कैद होतात. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आरोपींची ओळख पटवण्यात आणि पकडण्यात पोलिसांना मदत होते.
नुकताच पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हैदराबाद पोलिसांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये एक तरुण गर्दीचा फायदा घेत आपल्या पुढे असलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. यावेळी त्याला कोणीही आपल्याला पाहत नाही असं वाटत आहे. पण हा सगळा प्रकार तिथे उपस्थित एक व्यक्ती आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करत होती.
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये हैदराबाद पोलिसांनी लिहिलं आहे की, "रस्ता, सार्वजनिक ठिकाण जिथे कुठे तुम्ही गैरवर्तन करत असाल तिथे आमची शी टीम तुम्हाला रेकॉर्ड करत आहे. स्वत:ला जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आपली घाणेरडी विचारसरणी बदलणं हा एकमेव मार्ग आहे". दरम्यान व्हिडीओत दिसणाऱ्या या व्यक्तीवर काही कारवाई झाली की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Your behavior is being recorded by our She Teams on the roads, public places and wherever you are misbehaving, killing your ill intentions is the only mantra to keep you safe from being jailed.#SheTeams #HyderabadCityPolice pic.twitter.com/w9OHMYPAaX
— Hyderabad City Police (@hydcitypolice) September 14, 2024
पोस्ट केल्यानंतर या व्हिडीओला 1 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट करताना आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली नाही? अशी विचारणाही अनेकजण करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "हे गैरवर्तन रेकॉर्ड करणं एक बाजू आहे, पण शिक्षा देणं हाच उपाय आहे. किती जणांना शिक्षा दिली ही मुख्य समस्या आहे". दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, "या आरोपींचे फोटो सार्वजनिक करा, जेणेकरुन त्यांना लाज वाटेल". तर एकाने अशांना रस्त्यावर जाहीर शिक्षा द्यायला हवी असं मत मांडलं आहे.