...अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य

Crime News : हैदराबादमध्ये चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी केल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने 50 लाखांची अंगठी थेट बाथरुमध्ये टाकून दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 4, 2023, 12:54 PM IST
...अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य title=

Crime News : हैदराबादमधून (Hyderabad Crime) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने बाथरूममध्ये हिऱ्याची अंगठी (diamond ring) फेकली आणि नंतर ती फ्लश करुन टाकली. मात्र हा प्रकार काही रागाच्या भरात झालेला नाही. हैदराबादमध्ये एका महिलेने 50 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी चोरली होती. पण तिची चोरी पकडली गेल्यामुळे तिने हे धक्कादायक कृत्य केले आहे. मात्र, नंतर ही मौल्यवान अंगठी परत मिळाली आहे. तसेच आरोपी महिलेला पोलिसांनी (Hyderabad Police) अटक केली आहे.

हैदराबादमधील स्किन अँड हेअर क्लिनीकच्या एका कर्मचाऱ्याने महिला ग्राहकाकडून 50 लाख रुपये किमतीची हिऱ्याने जडवलेली अंगठी चोरली आणि पकडले जाण्याच्या भीतीने ती टॉयलेटच्या कमोडमधून फ्लश करुन टाकली. पोलिसांनी प्लंबरच्या मदतीने कमोडला जोडणाऱ्या पाइपलाइनमधून अंगठी जप्त केली आणि नंतर चोरीच्या आरोपाखाली आरोपी महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

बंजारा हिल्स येथील नरेंद्र कुमार अग्रवाल यांची सून 27 जून 2023 रोजी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील एफएमएस डेंटल अँड स्किन क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. उपचारादरम्यान महिलेने अंगठी काढून बाजूच्या टेबलावर ठेवली. त्यानंतर ती दवाखान्यातून निघून गेली म्हणून आणि अंगठी सोबत घ्यायला विसरली. काही वेळाने क्लिनिकमध्ये काम करणारी एक महिला त्या टेबलाजवळून गेली. तिने टेबलावरची अंगठी पाहिली आणि ती तिच्या पर्समध्ये ठेवली. मात्र, ही अंगठी खूप महाग असल्याचे समजताच ती घाबरली. अंगठी चोरताना पकडल्या जाण्याच्या भीतीने तिने बाथरुममध्ये जाऊन अंगठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून कमोडमध्ये फेकली आणि फ्लश केले.

दुसरीकडे, घरी पोहोचल्यानंतर अग्रवाल यांच्या सुनेला अचानक बोटातून अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. तिला आठवले की तिने अंगठी क्लिनिकमध्ये टेबलवर ठेवली होती पण ती घ्यायला विसरली होती. सूनेनं ताबडतोब दवाखाना गाठला आणि शोधाशोध सुरु केली. महिलेला ती अंगठी दवाखान्यात सापडली नाही. महिलेने आजूबाजूला खूप शोधले पण अंगठी सापडली नाही. त्यानंतर तिने क्लिनिकच्या कर्मचार्‍यांकडे अंगठीबाबत चौकशी केली. मात्र कोणीही काहीही सांगितले नाही.

त्यानंतर नरेंद्र कुमार यांनी ज्युबली हिल्स पोलीस ठाण्यात त्यांच्या सुनेची अंगठी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. डीआय रामप्रसाद आणि डीएसआय राजशेखर यांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी क्लिनिकमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली मात्र अंगठीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांकडे सखोल चौकशी केली असता चोरी करणारी महिला घाबरली. माझ्या पर्समध्ये टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेली अंगठी कोणीतरी ठेवली होती आणि मी ती वॉशरूमच्या कमोडमध्ये फेकली होती, असे महिलेने चौकशीत सांगितले आहे. पोलिसांनी प्लंबरच्या मदतीने कमोडमधून अंगठी बाहेर काढली आहे.