पतीने दिवसरात्र मुलीच्या शरिराचे लचके तोडले, पत्नीने दिल्या गर्भनिरोधक गोळ्या; दिल्लीतील उच्चभ्रू दांपत्याचं कृत्य

राजधानी दिल्लीत एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दिल्लीच्या महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक आहे. त्याच्या पत्नीने पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या होत्या.   

शिवराज यादव | Updated: Aug 21, 2023, 05:54 PM IST
पतीने दिवसरात्र मुलीच्या शरिराचे लचके तोडले, पत्नीने दिल्या गर्भनिरोधक गोळ्या; दिल्लीतील उच्चभ्रू दांपत्याचं कृत्य title=

राजधानी दिल्लीमध्ये महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला  बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. अधिकाऱ्याने आपल्याच मित्राच्या 14 वर्षीय मुलीवर (सध्याचं वय 17) अनेक महिने बलात्कार करत तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या या कृत्यात त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. पत्नीने मुलीला गर्भवती निरोधक गोळ्या दिल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. 

पीडित मुलगी 12 वीत शिकत असून 1 ऑक्टोबर 2020 रोजी वडिलांचं निधन झाल्यानंतर आरोपी प्रेमोदय खाखा आणि त्याच्या कुटुंबासह राहत होती. प्रेमोदय खाखा हा महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक आहे. तो तिचा स्थानिक गार्डियन होता. पीडित मुलगी त्याला मामा म्हणून हाक मारत होती. 

मुलगी 14 वर्षांची असताना आरोपीने नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपी प्रेमोदय आणि त्याच्या पत्नीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीवर मुलीची गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचा आरोप आहे. 

डीसीपी (नॉर्थ) सागर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांचं निधन झाल्यानंर ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत ती त्यांचा घरगुती मित्र आणि गार्डियनकडे राहू लागली होती. यादरम्यान पालकत्व स्विकारलेल्या तिच्या वडिलांच्या मित्राने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मुलगी घाबरु लागली होती. आणि आठवडाभरापूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं," असं त्यांनी सांगितलं आहे.

डॉक्टरांनी समुपदेशन केल्यानंतर अखेर मुलीने लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली अशी माहिती त्यांनी दिली आहे. "आरोपी आणि त्याच्या पत्नीने गर्भधारणा टाळल्यानंतर मुलीला पॅनिक अटॅक येऊ लागले होते. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तपास सुरु आहे," असं डीसीपी सिंह यांनी सांगितलं आहे.

"दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवल्यानंतर याप्रकरणी सविस्तर माहिती देण्यात येईल. मुलीची काळजी घेतली जात असून, ती हळूहळू धक्क्यातून सावरत आहे. ती अल्पवयीन असून, विद्यार्थिनी आहे," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. "एफआयआर नोंदवल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण डॉक्टरांनी तिची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे सांगत परवानगी नाकारली," असं डीसीपी सिंह यांनी सांगितलं.

महिला आयोगाकडून टीका

दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी या प्रकरणाच्या तपासावर नाराजी जाहीर केली आहे. तपास अत्यंत धीम्या गतीने सुरु असून, आरोपींना अद्याप अटक का केली नाही अशी विचारणी त्यांनी केली आहे. 

स्वाती मलिवाल पीडितेला भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. पण त्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. यानंतर त्यांनी तिथेच खाली बसून धरणं आंदोलन केलं. तसंच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. 

आरोपींना फक्त ताब्यात का घेतलं आहे? अटक का झाली नाही? दिल्ली पोलीस आरोपींना संरक्षण का देत आहेत? दिल्ली पोलीस मला पीडितेला भेटू का देत नाहीत? ते काय लपवू पाहत आहेत? असे अनेक प्रश्न स्वाती मलिवाल यांनी विचारले.