भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मन मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले 'ही यशोगाथा...'

भारतातील जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) हे रस्त्यावर भाजी खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 21, 2023, 03:22 PM IST
भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मन मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले 'ही यशोगाथा...' title=

करोनानंतर भारतामध्ये ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुपरमार्केटपासून ते रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत सर्वांकडे आता युपीआय पेमेंटची सुविधा आहे. दरम्यान, भारताच्या या प्रगतीने जर्मनीचे मंत्री भारावले आहेत. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांनी भारतातील या सुविधेचा लाभ घेतला असून सोपी पद्धत पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.  भारतातील जर्मन दूतावासाने रविवारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक केलं असून ट्विटरला पोस्ट शेअर केली आहे. हा भारताच्या यशोगाथेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले आहेत. 

जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांचे रस्त्यावर भाजी खरेदी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये  ते रस्त्याच्या शेजारी बसणाऱ्या भाजीवाल्याकडे खरेदी करताना दिसत आहे. यानंतर ते UPI च्या सहाय्याने पेमेंट करतानाही दिसत आहेत. 

ही पोस्ट शेअर करताना जर्मन दुतावासाने लिहिलं आहे की, "भारताच्या यशोगाथेपैकी एक म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा. UPI प्रत्येकाला काही सेकंदात व्यवहार करण्यास सक्षम करतं. लाखो भारतीय त्याचा वापर करतात. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांना UPI पेमेंटची साधेपणा अनुभवता आली. यामुळे ते प्रचंड भारावले आहेत".

वोल्कर विसिंग हे बंगळुरुत 19 ऑगस्ट रोजी झालेल्या G20 डिजिटल मंत्र्यांच्या मीटिंगसाठी उपस्थित होते. दरम्यान, जर्मनीच्या दुतावासाने केलेल्या पोस्टवर सोशल मीडिया युजर्स व्यक्त झाले आहेत. भारताच्या डिजिटल आर्थिक क्रांतीचा भाग झाल्याबद्दल युजर्सनी त्यांचे आभार मानले आहेत. 

एका युजरने म्हटलं आहे की, "भारताच्या डिजिटल आर्थिक क्रांतीचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद. शेअर करत रहा आणि वापरत राहा." तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, "जर्मनमधील व्यापारी आणि ग्राहकांसाठी हा एक आशीर्वादच आहे, जे रोख व्यवहार करताना फार संघर्ष करतात".

उल्लेखनीय बाब म्हणजे, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारताची जलद पेमेंट प्रणाली आहे. UPI ग्राहकांना 24 तासात कधीही पेमेंट त्वरित करण्याची सुविधा देते. UPI ग्राहकाने तयार केलेला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरते. आतापर्यंत, श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर यांनी यासाठी भारतासोबत भागीदारी केली आहे. जुलैच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्स UPI पेमेंट यंत्रणा वापरण्यास सहमत असल्याची घोषणा केली होती.