नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन होत असल्याची मोठी घोषणा केली. भारतीयांच्या आरोग्यासाठीच हा मोठा निर्णय घेत असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा व्हायरस अधिक मोठ्या प्रमाणात वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची कल्पनाही करू शकत नाही नसल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इटलीतील आरोग्य व्यवस्थेचाही दाखला दिला. सध्याच्या घडीला या दोन देशांतील आरोग्य यंत्रणा जगात सर्वोत्तम मानल्या जातात. पण, असं असूनही हे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यास या देशांनाही अपयश आलं असल्याचं पंतप्रधांनांनी सांगितलं.
संपूर्ण जनतेला संबोधित करताना मोदींनी कोरोना किती भयानक परिस्थितीत पोहचू शकतो याबाबत सांगताना कोरोनाची आकडेवारीही सांगितली. सुरुवातीला ६७ दिवसांत एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर अवघ्या ११ दिवसांत तब्बल दोन लाखांपर्यंतचा टप्पा पार झाला. तर त्यानंतरच्या चार दिवसांतच कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांवर पोहोचली, ही आकडेवारी सांगत मोदींनी या फोफावणाऱ्या कोरोनाला थांबवणं किती गरजेचं आहे, हा मुद्दा अधोरेखित केला.
संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन होत आहे. या लॉकडाऊनची देशाला मोठी किंमत मोजवी लागेल. पण सध्याच्या घडीला माझ्यासाठी प्रत्येक भारतीयाचा जीव महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. आपलं एक घराबाहेर पडलेलं पाऊल कोरोनाला आपल्या घरात आणू शकतं. त्यामुळे सर्वांनी 21 दिवस घरातच राहण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. आपण असेच निष्काळजीपणे वागत राहिलो तर देशाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोना फैलावल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे सर्वांना वाचवण्यासाठीच संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याचं मोदींनी सांगितलं.