नवी दिल्ली : अवैध कामातून मिळालेले दोन कोटी... करकरती नोटांनी काटोकाठ भललेल्या दोन अवजड बॅगा... आता मस्तपैकी या देशातून परागंदा व्हायचे आणि विदेशात जाऊन ऐशोआरामाचे जीवन जगायचे... तेही एकट्याने नव्हे आपल्या खास गर्लफ्रेंडसोबत. हा विचार करत तो आपल्या लाडक्या गर्लफ्रेंडच्या घरात घुसला. पण, त्याचा हाच मोह त्याला भारी पडला. घरात पाऊल टाकताच पोलिसांनी त्याला तब्यात घेतले आणि त्याचा प्लान जागीच गोठला.
प्रकरण आहे दिल्लीतील. राहुल कुमार (वय-२५) असे आरोपीचे नाव. त्याने दिल्लीतील एका व्यवसायीकाच्या मुलाचे अपहरण केले. अपहरणातून त्याने त्या व्यवसायीकाकडून प्रचंड मोठी रक्कम वसूल केली. अपहरण केलेल्या मुलाला सोडून दिले. पण, कोणताही गुन्हेगार पुरावा मागे ठेवतोच, असे म्हणतात. राहुलच्या प्रकरणातही ते खरे ठरले. त्याने पहिली चूक केली ती म्हणजे त्याने अपहरण केले. पण, तो जेथे काम करत होता त्याच ठिकाणी त्याने अपहरण केले. त्यानंतर तो गायब झाला खरा. पण, आपल्या सहकाऱ्याला तो सतत फोन करून परिस्थितीची माहिती घेत राहीला. त्यातही त्याने ज्या मुलाचे अपहरण केले त्याच्याच फोनवरून त्याने आपल्या सहकाऱ्याला फोन केले.
दरम्यान, पोलिसांकडे तक्रार गेली होती. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड करायला आणि कॉल हिस्ट्री तपासायलाही सुरूवात केली. पोलीस तपासात पुढे आले की, अपहरण करण्यापूर्वी राहुल दिवसभरात सुमारे ३५ कॉल करत असे. पण, अपहरण करताच तो केवळ दोनच कॉल करत असे. एक आपल्या सहकाऱ्याला आणि दुसरा आपल्या गर्लफ्रेंडला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार राहुलच्या गर्लफ्रेंडच्या घरावर नजर ठेवण्यास सुरूवात केली. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलाने पोलिसांना माहिती दिली होती. त्याने सांगितले होते की, त्याला एनएच-२४ जवळ ठेवण्यात आले होते. तिथून गाड्यांचा आवाजही येत होता.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू केला. पोलिसांना ध्यानात आले की, गुन्हेगार हे विनोद नगर परिसरात राहतात. गर्लफ्रेंडच्या घरी आलेल्या राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर काही वेळातच त्याचे दुसरे दोन साथीदार सुनील आणि घनश्यामलाही अटक झाली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३.९६ कोटी रूपयांची रक्कम जप्त केली. तिघेही आरोपी सध्या तुरूगांत आहेत. प्रकरणातील चौथा आरोपी फरार आहे. त्याच्याकडे ४ लाख रूपये आहेत.
१ जानेवारीला राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वसंत विहार येथून आय-२०कार मध्ये व्यवसायीकाच्या मुलाचे अपहरण केले होते. मुलाची सुटका करण्यासाठी त्यांनी तब्बल ५ कोटी रूपयांची रक्कम मागितली होती. नोकरीवरून काढल्यामुळे राहुल मालकावर चिडला होता. बदला घेण्यासाठी त्याने मालकाच्या मुलाचे अपहरण केले होते. रक्कम मिळताच त्याने मालकाच्या मुलाची सुटकाही केली होती.