मुंबई : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 50 टक्के कर्मचार्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाने उपसचिव पातळीवरील अधिकाऱ्यांना घरातूनच काम करण्यास सांगितले आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने भयानक रुप धारण केलं आहे. दररोज बाधितांची संख्या वेगाने वाढत असून, आरोग्य यंत्रणांवर असह्य ताण पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे बेडपासून ते इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
Zee Newsची सहयोगी वेबसाइट DNAच्या रिपोर्टनुसार गृह मंत्रालयाने उपसचिव किंवा समकक्ष आणि खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाच्या कार्यालयात केवळ 50 टक्के कर्मचारी काम करतील आणि कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात येईल. (Home Ministry cautious about Coronavirus, half staff ordered to work from home)
मंत्रालयाने एक अधिकृत पत्र पाठवून म्हटले आहे की, 'संबंधित विभाग प्रमुख कार्यालयात हजेरी लावण्यासाठी कर्मचार्यांची यादी तयार करतील. उपसचिव, समकक्ष किंवा त्यावरील सर्व अधिकारी नियमितपणे कार्यालयात येतील.
गृह मंत्रालयाने सांगितले की सर्व अधिकारी सकाळी 9 ते 10 दरम्यान वेगवेगळ्या वेळी कार्यालयात येतील आणि त्यानुसार ते त्यांच्या सुटण्याची वेळ देखील बदलू शकतात. यामुळे लिफ्ट किंवा कॉरिडॉरमध्ये गर्दी कमी होईल. या संदर्भात विभाग प्रमुख रोस्टर सिस्टम बनवतील.
घरातून काम करणारे (Work From Home) कामगार नेहमी टेलिफोनद्वारे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कार्यालयात जोडले जातील. याशिवाय कार्यालयात येणाऱ्या कर्मचार्यांना कोविड -19 संबंधित सर्व मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागतील.