उडुपी : देशामध्ये समान नागरी कायदा लागू होईपर्यंत हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा. यामुळे लोकसंख्येमध्ये असलेलं असंतुलन नियंत्रणात येईल, असं वक्तव्य हरिद्वारच्या भारत माता मंदिराचे स्वामी गोविंद देव गिरजी महाराज यांनी केलं आहे. ज्या क्षेत्रामध्ये हिंदू लोकसंख्या कमी झाली तो भाग भारतानं गमवला. दोन मुलांचं धोरण फक्त हिंदूंसाठीच नसावं, असंही महाराज म्हणाले आहेत.
कर्नाटकच्या उडुपीमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून तीन दिवसांच्या धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बातचित करताना गोविंद देव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गोरक्षणाच्या नावाखाली काही जण स्वत:चे हिशोब चुकते करत आहेत. गोरक्षक शांतताप्रिय आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी गोरक्षकांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोपही गोविंद देव यांनी केला आहे. धर्म संसदेमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त हिंदू संत, मठाधीश आणि देशभरातल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे.