गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण, २६० जणांचा मृत्यू

सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे एकूण २,१६,९१९ रुग्ण आहेत. 

Updated: Jun 4, 2020, 10:37 AM IST
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण, २६० जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २६० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी  वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे. सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे एकूण २,१६,९१९ रुग्ण आहेत. यापैकी १, ०६, १३७ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत १,०४, १०७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारला; आतापर्यंत ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. हा आकडा असाच वाढत राहिल्यास कोरोना रुग्णांची संख्या दररोज १० हजाराने वाढण्याची शक्यता आहे. देशात ३० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांवर पोहोचली. मात्र, त्यानंतरच्या १५ दिवसांतच या संख्येत आणखी एक लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरील चिंता वाढली आहे. 

भारतात कोरोनाचा समूह संसर्ग अटळ; ICMR मधील तज्ज्ञांची केंद्रावर टीका

देशातील अनेक तज्ज्ञांनी जून आणि जुलै महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. बुधवारी कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.