चंदीगड : हरियाणा केंद्रीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता संघ नेत्यांचे धडे दिले जाणार आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याची माहिती खुद्द विद्यापीठाच्या प्रशासनाकडूनच गुरुवारी देण्यात आली. त्यामुळे आता यापुढे हरियाणा केंद्रीय विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात संघाच्या नेत्यांचे धडे दिले जाणार आहेत.
हरियाणातील केंद्रीय विद्यापीठात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते माधव सदाशिवराव गोळवलकर, दिनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दलचा इतिहास शिकवला जाणार आहे.
राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांनंतर संघाच्या नेत्यांबद्दलचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
माधव गोळवलकर, दियदयाळ उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासोबतच स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, दयानंद सरस्वती, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांचाही समावेश अभ्यासक्रमात हरियाणा केंद्रीय विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.