चंदीगड : हरियाणात सत्ताधारी भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. हरियाणात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि तेही पूर्ण बहूमत असेल, असे सांगितले जात होते. त्याचवेळी एक्झिट पोलने अंदाजही वर्तवला होता. मात्र, हा अंदाजही चुकला आहे. भाजपने ९० पैकी ७५ जागांवर आम्ही निवडून येऊ असा दावा केला होता. मात्र, भाजपला ४० जागाही मिळणे अशक्य झाले आहे.
हरियाणामध्ये ९० जागांसाठी मतदान २१ ऑक्टोबर रोजी पार पडले आहे. ९० पैकी ४६ जागा जिंकण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. अद्याप निकाल हाती आलेले नाहीत. भाजपने ३८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने २९ जागा जिंकल्या आहेत. तर अन्य २० जणांनी बाजी मारली आहे. तीन जागांचे निकाल येणे बाकी आहे. यात भाजप दोन तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरले आहेत. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागेल. तसेच काँग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे भाजप अधिक सावध झाली आहे.
भाजपने ७५ जागांवर आम्ही निवडून येऊ आणि पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार हरियाणात बसणार असे सांगत होते. मात्र, जनतेने भाजपला पुन्हा नाकारल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा भाजपचे स्पष्ट बहुमतातील सरकार विराजमान होईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज साफ चुकीचा ठरला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांची खुर्ची धोक्यात आली आहे. आज मतमोजणीवेळी भाजप विजयासाठी झगडताना दिसला.