'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Gurugram Restaurant : हरियाणाच्या एका हॉटेलमध्ये मुखवास खाल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करावलं लागलं आहे. मुखवास खाल्यानंतर पाच जणांच्या तोडांतून रक्त येत असल्याचा दावा त्यांनी केला होता. 

आकाश नेटके | Updated: Mar 5, 2024, 11:57 AM IST
'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार title=

Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर? हरियाणामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये La Forestta Cafe या रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव जाता जाता वाचला. गुरुग्रामच्या सेक्टर 90 मधल्या रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, पाचही जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. पीडित कुटुंब आणि तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सध्या दोन जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांवर अद्याप उपचार सुरू असून एक जण आयसीयूमध्ये आहे.

2 मार्च रोजी रात्री 9:30 च्या सुमारास अंकित कुमार नावाची व्यक्ती त्याच्या पत्नी आणि मित्रांसोबत रात्रीच्या जेवणासाठी गुरुग्राममधील खेडीकीदौला सेक्टर 90 इथल्या La Forestta Cafe रेस्टॉरंटमध्ये गेली होती. रात्रीच्या जेवणानंतर त्यांना माउथ फ्रेशनर देण्यात आले. ते खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप अंकित कुमारने केला. त्यांनी त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर देखील व्हायरल केला. व्हिडिओमध्ये पाचही लोक काहीतरी खाल्ल्यानंतर अस्वस्थ झालेले दिसत आहेत. तोंडातून लाल रंगाचा द्रव बाहेर येत असून त्यांना वेदना होत असल्याचे दिसत होते.

या सगळ्या प्रकारानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आले. पोलीस आल्यावर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी अंकित कुमारने त्यांना दिलेल्या माऊथ फ्रेशनरचा नमुना स्वत:जवळ ठेवला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जणांनी जी वस्तू खाल्ली तो ड्राय आईस होता. हे कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. हे पदार्थांना थंड ठेवण्यासाठी  वापरले जाते. 

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेवणासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांनी माऊथ फ्रेशनर म्हणून ड्राय आईस खाल्ल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रार मिळानंतर पोलिसांनी 3 मार्च रोजी एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली. रेस्टॉरंट चालकाविरुद्ध कलम 328 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्राय आईस म्हणजे काय?

ड्राय आईस हा कोरड्या बर्फासारखा असतो आणि तो पाण्यापासून बनवला जात नाही. हे खूप ठिकाणी उपयोगी असला तरी खूप धोकादायकसुद्धा आहे. याचे तापमान जवळपास उणे 80 अंशांपर्यंत असते. मात्र तो सामान्य बर्फासारखा ओला नसते. ड्राय आईस जास्त तापमानात येताच वितळण्याऐवजी धुरासारखे उडू लागतो. हा बर्फ तयार करण्यासाठी आधी कार्बन डायऑक्साइड 109 डिग्री फॅरेनहाइटवर थंड केला जातो आणि कॉम्प्रेस केला जातो, ज्यामुळे हा वायू बर्फ बनतो आणि त्याचा आकार लहान किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये बदलतो.