माणूस क्षणात प्रेम कसं विसरू शकतो? पत्नीची हत्या करून केले मृतदेहाचे तुकडे, पतीला अटक

Gurugram Crime : पत्नीचे तुकडे तुकडे करुन हत्या करणाऱ्या आरोपी पतीला गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. 21 एप्रिल रोजी महिलेचे धड सापडले होते. त्यानंतर महिलेचे अवयव विविध ठिकाणी सापडले होते.

आकाश नेटके | Updated: Apr 28, 2023, 06:42 PM IST
माणूस क्षणात प्रेम कसं विसरू शकतो? पत्नीची हत्या करून केले मृतदेहाचे तुकडे, पतीला अटक title=

Crime News : पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय व्यक्तीला गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हरियाणातील (Haryana) गुरुग्राममध्ये या महिलेच्या मृतदेहाचे अर्धे जळालेले तुकडे सापडले होते. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या पतीविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. गुरुग्राम पोलिसांनी 21 एप्रिल रोजी मानेसर भागातील कुकडोला गावातील शेतात बांधलेल्या एका खोलीतून या महिलेचे अर्धे जळालेले धड जप्त केले होते. यानंतर काही दिवसांनी पोलिसांना तिचे हात आणि डोकेही सापडले होते.

मृत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आढळले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. पोलिसांनी याप्रकरणी जितेंद्र नावाच्या आरोपीला मानेसर येथून अटक केली आहे. जितेंद्र गांधी नगरचा रहिवासी असून मानेसर परिसरात भाड्याने राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उमेद सिंग नावाच्या या गावकऱ्याने आपल्या शेतात बांधलेल्या खोलीतून धूर निघत असल्याने पोलिसांना याची माहिती दिली. मात्र घरात जाऊन पाहिले असता पोलिसांना अर्धे जळालेले धड पाहून धक्का बसला होता.

नेमकं काय घडलं?

मानेसरमधील पाचगाव चौकाजवळील कुकडोला गावात 21 एप्रिल रोजी एका घरातून 30 वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचे डोके गायब होते आणि हात कापलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव चौकातून कासन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उमेद सिंग यांनी ही आठ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या जमिनीवर असलेल्या दोन खोल्यांच्या घरात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. "माझ्या शेजाऱ्याने मला फोनवर सांगितले की माझ्या शेतातील एका खोलीतून धूर निघताना दिसला. शेतात गेलो असता खोलीत अर्धे जळालेले धड आढळून आले. मी लगेच पोलिसांना कळवले," असे उमेद सिंग यांनी सांगितले.

यासर्व प्रकारानंतर उमेद सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे, मानेसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या महिलेची हत्या अन्य ठिकाणी झाल्याचा अंदाज पोलिसांना आहे. पोलीस आता महिलेच्या मृतदेहाच्या इतर भागांचा शोध घेत होते. त्यानंतर 23 एप्रिल रोजी महिलेचे कापलेले दोन्ही हात आणि 26 एप्रिल रोजी संध्याकाळी महिलेचे डोके खेरकिदौला पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळून आले.

कशामुळे झाली हत्या?

जितेंद्रचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम होते. त्यांनी मानेसर येथे भाड्याने घर घेतले होते. जितेंद्र नौदलात होता मात्र त्याने नोकरी सोडली. त्यानंतर जितेंद्र दुसरीकडे काम करु लागला. मात्र घरातील छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पत्नीला अनेकवेळा त्याच्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यानंतर हळुहळू पैशाच्या कमतरतेमुळे पत्नीने जितेंद्रला टोमणे मारण्यास सुरुवात केली. याचदरम्यान जितेंद्रचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. त्यामुळे दोघांमधला वाद आणखीनच वाढला. आता त्याचा संयम सुटत चालला होता. एक वेळ अशी आली की त्याच्या संयमाचा बांध फुटला. त्याने पत्नीला कायमचे शांत करण्याचे ठरवले.

पण एके दिवशी त्याच्यांत जोरदार वाद पेटला. चिडलेल्या जितेंद्रने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि पत्नीच्या पोटात सपासप वार केले. जितेंद्र हे सर्व रागाने बघत राहिला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजतात जितेंद्र हळहळू भानावर आला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह लपवून ठेवण्याची योजना आखली. यासाठी त्याने चाकूने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. जितेंद्रने पत्नीचे हात, पाय आणि धड कापले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात पत्नीचे धड घेऊन त्याने शेतातील घर गाठले आणि तो मृतदेह पेटवून तिथून पळ काढला.