चंडीगढ : बलात्कार प्रकरणी राम रहिमला २० वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर आता डेरा सच्चा सौदाच्या संपत्तीचा वारसदार निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात राम रहिमच्या गुरुसरमोडिया या मूळ गावी कुटुंबाची बुधवारी पहिली बैठक झाली. हा वारसदार एक हजार कोटी रुपयांची संपत्ती सांभाळणार आहे.
या बैठकीत गुरमीत राम रहिमचा मुलगा जसमीत इंसा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असेल यावर शिक्कामोर्तब झालंय. राम रहिमची आई नसीब कौर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. डेराचे अनुयायी जसमीतला आध्यात्मिक गुरु मानणार नाही, पण डेरा सच्चा सौदाचं व्यवस्थापन आणि सर्व कार्य सांभाळेल, असंही त्या म्हणाल्या.
बैठकीनंतर कुटुंबाने रोहतक जेलमध्ये कैद असलेल्या राम रहीमला भेटण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांकडे वेळ मागितला आहे. डेरा प्रमुखाने शिक्कामोर्तब केल्यानंतर नव्या प्रमुखाच्या नावाची घोषणा केली जाईल.
हनीप्रीत बैठकीला नाही -
डेरा सच्चा सौदाचा नवा प्रमुख निवडण्यासाठी झालेल्या बैठकीबाबत अतिशय गुप्तचा बाळगण्यात आली होती. या बैठकीत राम रहिमची आई नसीब कौर, पत्नी हरजीत कौर आणि मुलगा जसमीत इंसा हेच सहभागी झाले होते. दोन्ही मुली आणि दत्तक मुलगी हनीप्रीतही बैठकीला उपस्थित नव्हत्या.
दरम्यान, हरियाणाच्या १८ जिल्ह्यांमध्ये डेरा सच्चा सौदाची १०९३ एकर जमीन असून त्याची किंमत अंदाजे ११५१ कोटी रुपये आहे. डेराच्या जमिनीवर बनलेल्या आश्रमांच्या किंमतीचा अनुमान अद्याप लावलेला नाही.