पोलिसांसमोर हातात पाण्याची बाटली घेऊन तरुणांचा डान्स; Viral Video मागचं नेमकं सत्य काय?

एका लग्नात काही लोक मद्यपान करुन बेधुंद अवस्थेत नाचत असल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी व्हिडीओत नाचत असलेल्या सातही जणांना अटक (Arrest) केली आणि पुन्हा त्याच जागी नेत नाचायला लावलं.     

Updated: Feb 23, 2023, 06:33 PM IST
पोलिसांसमोर हातात पाण्याची बाटली घेऊन तरुणांचा डान्स; Viral Video मागचं नेमकं सत्य काय? title=

गुजरातमधील (Gujarat) राजकोट (Rajkot) येथे लग्नाच्या वरातीत मद्यपान करुन नाचणं काहीजणांना चांगलंच महागात पडलं. मद्यपान करुन नाचत असतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला. यानंतर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि बेड्या ठोकल्या. यानंतर पोलीस त्यांना घेऊन नाचलेल्या त्याच ठिकाणी नेलं आणि 'क्राइम सीन' प्रमाणे पुन्हा एकदा नाचण्यास भाग पाडलं. पोलिसांसमोर डान्स करतानाचा त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हे सर्वजण सोमवारी एका लग्नाच्या वरातीत मद्यधुंद अवस्थेत दारु उडवत नाचताना दिसले होते. त्यांचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. याचं कारण म्हणजे गुजरातमध्ये दारुबंदी आहे. त्यामुळे मद्यप्राशन करणं हा गुन्हा आहे. यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं हिरेन उर्फ हेरी परमार, प्रतीक उर्फ कलियो परमार, धवल मारू, जयेश उर्फ गतियो दवे, मयूर खिंट, धर्मेश उर्फ आसुदो रजनी, अजय उर्फ जबरो रमानी आणि नितिन खांडेखा अशी आहेत. गुजरात दारूबंदी कायद्यान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर खांदेखा वगळता उर्वरित सात जणांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

या सात जणांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना पुन्हा एकदा नाच केलेल्या जागी घेऊन गेले आणि वरातीत नाचले तसेच पुन्हा एकदा नाचण्यास सांगितलं. यावेळी दारुच्या बाटलीच्या जागी पोलिसांनी पाण्याची बाटली दिली होती. त्यांचा डान्स करतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यामध्ये एकट्या मारुविरोधात 9 गुन्हे दाखल आहेत.