नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या काळात विविध वेळांमध्ये काम करावं लागण्याची चिन्हं आहेत. शिवाय कामाच्या ठिकाणी कर्मचारी संख्यासुद्धा बऱ्याच अंशी कमी राहणार आहे.
कोरोना विषाणूची वैश्विक महामारी आणि त्यामुळं उदभवणारी एकंदर परिस्थिती पाहता केंद्रीय कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी लॉकडाऊननंतरच्या काळातही घरुन काम करण्याची रुपरेषा तयार करण्यात आली आहे.
तयार करण्यात आलेल्या रुपरेषेअंतर्गत कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांनी व्यक्तीगतपणे एका वर्षात १५ दिवसांसाठी घरुन काम करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येण्याची चिन्हं आहेत. सध्याच्या घडीला केंद्रात जवळपास ४८.३४ लाख कर्मचारी सेवेत आहेत. ज्यांच्या कामाच्या वेळा आणि काही अंशी त्यांची कार्यपद्धतीसुद्धा बदलणार आहे.
वाचा : भारतात लॉकडाऊनमुळे किती फरक पडला?
केंद्राकडून सर्वच विभागांना पाठवलेल्या एका पत्रकामध्ये कोरोनाचं महत्त्वं जाणत या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी म्हणून अनेक विभागांमतील कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा दिली आहे. येत्या काळातील एकंदर परिस्थितीचं संभाव्य चित्र पाहता, कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यापासून ते अगदी त्यांना विविध वेळांमध्ये काम करण्यासही तयार रहावं लागू शकतं, अशा शक्यता वर्तवत भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.