तिरुवनंतपुरम: हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर केरळमध्ये पूरात ताटातूट झालेल्यांचा शोध घेण्यासाठी करण्यात येत आहे. केरळमधल्या पावसाच्या हाहाकारात तब्बल 324 जणांनी प्राण गमावले आहेत.
लाखो जण विस्थापित झाले आहेत आणि अजूनही 14 पैकी तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी आहे. ज्या भागात शेकडो लोकांची ताटातूट झाली आहे, अशा पूरग्रस्त भागामध्ये गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर शक्य आहे. हे टूल डेस्कटॉप किंवा मोबाइलवरुन लॉगइन करून वापरता येतं. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अथवा हरवलेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी हे टूल वापरता येते.
मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भीषण पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार गेल्या १०० वर्षांतील ही सर्वात भीषण परिस्थिती आहे. जवळपास ८० धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. यामध्ये आतापर्यंत ३२४ जणांचा बळी गेला आहे. तर दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी १९२४ साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती ओढावली होती.