मुंबई : गेल्या 20 दिवसांत सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. MCX वर, 10 ग्रॅम सोन्याचा दर 155 रुपयांनी कमी होऊन 51,721 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्हींमध्ये घसरण नोंदवण्यात आली.
एमसीएक्सवर चांदीही फिकी पडल्याचे दिसून आले. एक्सचेंजवर चांदीची किंमत 316 रुपयांनी घसरून 68,520 रुपये प्रति किलो झाली. चांदीचा भाव 68,511 वर उघडला होता.
अवघ्या 20 दिवसांत सोन्याचा भाव 4,087 रुपयांनी खाली आला आहे. मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता.
भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून ते जागतिक बाजारपेठेत विकण्याची तयारी सुरू आहे. सोन्याचा हा साठा बाजारात आल्यास त्याचा बाजारातील पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते.