Asaram Bapu : आसाराम बापूच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2013 मधल्या सूरत बलात्कार प्रकरणात (Surat Rape Case) गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला (Asaram Bapu) दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी कोर्ट उद्या शिक्षा सुनावणार आहे. याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2013 मध्ये आसाराम बापूवर सूरतमधल्या एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर पीडित मुलीच्या लहान बहिणीवर नारायण साई (Narayan Sai) याने अत्याचार केल्याचा आरोप होता.
याप्रकरणात आसाराम बापूशिवाय त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि इतर चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला,जस्सी आणि मीरा यांनाही आरोपी ठरवण्यात आलं आहे. आसाराम यांना व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने आसाराम बापूला दोषी ठरवलं. पण शिक्षा सुनावली नाही. याप्रकरणात मंगळवारी म्हणजे 31 जानेवारीला फैसला सुनावला जाणार आहे.
आसाराम बापू बलात्काराच्या आणकी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. जोधपूर इथे तो तुरुंगवास भोगतोय. याआधी आसाराम बापूच्यावतीने कोर्टात जामीनासाठी याचिका करण्यात आली होती. पण कोर्टाने ती फेटाळली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली होती. वाढतं वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे जामीन मिळावा अशी बाजू आसाराम बापूच्यावतीने मांडण्यात आली होती. पण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. आता सूरत प्रकरणातही शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे आसाराम बापूला सध्यातरी कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.
कोण आहे आसाराम बापू?
आसाराम बापूचं खरं नाव असुमल हरपलानी असं असून 1941 मध्ये सिंध प्रांतातल्या बेरानी गावात त्याचा जन्म झाला. 1947 च्या फाळणीत असुमल हरपलानी याचं कुटुंब भारतात अहमदाबाद शहरात स्थायिक झालं. पुढे 60 च्या दशकात आसारामने लीला शाह यांना आपलं अध्यात्मिक गुरु मामलं आणि लीला शाह यांनीच अमुमलचं नाव आसाराम असं ठेवलं.
त्यानंतर आसारामने अहमदाबादपासून 10 किलोमीटर दूर असलेल्या साबरमती नदीच्या किनारी आपला पहिला आश्रम सुरु केला. इथूनच त्याच्या अध्यात्मिक कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे देशातल्या अनेक राज्यात त्याच्या भक्तांमध्ये वाढ होत गेली. आसारामच्या अधिकृत वेबसाईटनुसार जगभरात त्यांचे 40 लाख अनुयायी आहेत. आसारामने आपला मुलगा नारायण साई याच्यासह देश-विदेशात 400 आश्रमांचं जाळं उभारलं.