मुंबई : सिनेमा आणि वेब सीरिजच्या पोस्टरवरून अनेक वाद निर्माण होत आहेत. अशातच 'मासूम सवाल' या चित्रपटाच्या पोस्टरवरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Masoom Sawaal Controversy)
हिंदु राष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अमित राठोड यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर आक्षेप नोंदवला आहे. 'मासूम सवाल' चित्रपटाच्या पोस्टरवर जाणीवपूर्वक वादग्रस्त पोस्टर लावण्यात आलं आहे. मासिक पाळीवेळी वापरण्यात येणाऱ्या पॅडवर श्री कृष्णाचा फोटो लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याचं अमित राठोड यांनी म्हटलं आहे.
5 ऑगस्ट रोजी ‘मासूम सवाल’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही सुरूच असून काही संघटनांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना धमकीही दिली आहे. दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
'मासूम सवाल' चित्रपटाच्या पोस्टरवरून इतका मोठा वाद होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. चित्रपट पूर्णपणे मासिक पाळीवर आधारित आहे. त्यामुळे आम्हाला सॅनिटरी पॅड दाखवणं गरजेचं असल्याचं संतोष उपाध्याय यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या चित्रपटामध्ये एकावली खन्ना, नितांशी गोयल, शिशिर शर्मा, मधु सचदेव, रोहित तिवारी, वृंदा त्रिवेदी, रामजी बाली, शशी वर्मा हे कलाकार आहेत.