गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शेतामध्ये पिस्तूल चालवायचे प्रशिक्षण

राजेश बांगेरा याने मारेकऱ्यांना पिस्तुल आणि इतर शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले. 

Updated: Aug 17, 2018, 01:09 PM IST
 गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शेतामध्ये पिस्तूल चालवायचे प्रशिक्षण title=

बंगळुरु: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांच्या हाती एक नवा दुवा लागला आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी बेळगाव येथे काही जणांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. येथील जांबोटी गावातील एका शेतात सहाजणांनी हे प्रशिक्षण घेतले. या सहा जणांमध्ये महाराष्ट्रातील एक डॉक्टरचाही समावेश असल्याचे समजते. 
 
 हे शेत गौरी लंकेश हत्याप्रकरणातील १२ वा आरोपी असलेल्या भारत कुरणे याच्या मालकीचे आहे. गेल्या आठवड्यात एसआयटीने त्याला ताब्यात घेतले होते. राजेश बांगेरा याने मारेकऱ्यांना पिस्तुल आणि इतर शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले. 
 
 गेल्या महिन्यात मदिकेरी येथून त्याला अटक केली होती. एका स्थानिक राजकीय व्यक्तीचा तो स्वीय सहायक आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये झाली होती. त्याच्या दोन-तीन महिन्यांआधी म्हणजेच एप्रिल-मे २०१३मध्ये मारेकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, मारेकरी एकमेकांना छोटे मियाँ, बडा भाई, भाईसाहब, काका, मामा, दादा, बंधू अशा सांकेतिक नावांनी हाका मारायचे. लंकेश यांच्या डोक्यात गोळी घाला, असे मारेकऱ्यांना सरावादरम्यान सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.