G20 Rishi Sunak: जी 20 परिषदेसाठी जगातील टॉपचे नेते दिल्लीत आले आहेत. भारतातील संस्कृती, पाहुणचार पाहून सर्वच भारावून गेले आहेत. या साऱ्यांमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे लक्ष वेधून घेत आहेत. ते भारताचे जावई असलेले ऋषी सुनक देशाच्या प्रेमात पडले आहेत. आपली पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत ते भारतात आले असून त्यांनी विविध ठिकाणांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत. तर उर्वरित परदेशी नेते आज राजघाटावरील महात्मा गांधींच्या स्मारकाला भेट देणार आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती याही अक्षरधाम मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत येण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भेटीबाबत अधिकारी अधिकृतरित्या कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. असे असले तरीही अक्षरधाम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ब्रिटीश उच्चायुक्तांनीही ब्रिटीश पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीच्या भेटीची माहिती मंदिर अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार 'मयूर द्वार' येथे या जोडप्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान ऋषी सुनक शुक्रवारी दुपारी भारतात पोहोचले. येथे त्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि इतर वरिष्ठांनी केले. पंतप्रधान सुनक यांनी शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राष्ट्रीय राजधानीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी द्विपक्षीय बैठक घेतली. दरम्यान रविवारी सकाळी स्पेन, इंडोनेशिया आणि इतर देशांतील नेत्यांसह अनेक परदेशी मान्यवर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटला भेट देतील.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनणारे पहिले भारतीय मूळचे नेते आहेत. पंजाबमधील लुधियाना येथे त्यांचे मूळ आहे. तर त्यांची पत्नी अक्षता मूर्ती बेंगळुरूची रहिवासी आहे. अनेक भारतीय नेत्यांसमोर सनक यांनी आपली हिंदू ओळख सांगण्यास कधीही संकोच केला नाही. भारतात आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वत:ला एक अभिमानी हिंदू म्हटले होते. दरम्यान ते अक्षरधाम मंदिराला भेट देण्यासाठी देखील जाऊ शकतात असे संकेत दिले होते.