...अखेर 'त्या' महिलेच्या मृतदेहाला पोलिसांनी दिला खांदा

मृतदेहाला खांदा द्यायला कोणीही तयार नसल्याने पोलिसांनी एका मृत महिलेला खांदा देऊन त्यानंतर अंत्यसंस्कारही पार पाडले आहेत. 

Updated: May 18, 2020, 10:16 PM IST
...अखेर 'त्या' महिलेच्या मृतदेहाला पोलिसांनी दिला खांदा title=

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात पोलीस, डॉक्टर, नर्सेस देवाच्या रुपातच संपूर्ण जनतेची मदत करत आहेत. या सर्वांकडून सतत माणूसकीचं एक नवं उदाहरणच समोर ठेवलं जात आहे. पोलीस केवळ आपली ड्यूटीच पार पाडत नसून सर्वांना विविध मार्गांनी मदत करत आहेत. मृतदेहाला खांदा द्यायला कोणीही तयार नसल्याने पोलिसांनी एका मृत महिलेला खांदा देऊन त्यानंतर अंत्यसंस्कारही पार पाडले आहेत. 

रविवारी रात्रीच्या सुमारास एका वृद्ध महिलेचं निधन झालं. या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीला त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी अंत्यसंस्कारासाठी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर मृत महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध महिलेच्या मृतदेहाला खांदा घेऊन तिला स्मशानभूमीत नेलं आणि मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. 

रस्त्यातच 'त्या' मजुराची तब्येत बिघडली, पण मित्राने शेवटपर्यंत साथ दिली

 

वृद्ध महिला 62 वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. महिलेच्या निधनानंतर त्यांच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये याबाबत सांगत, मदत मागितली. ही महिला अमृतसर येथील असून ती पतीसोबत दिल्लीतील जैतपूर येथील पोलीस स्टेशन भागात राहत होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून वृद्ध महिलेची प्रकृती ठिक नव्हती. मात्र महिलेच्या मृत्यूनंतर कोणीही त्यांच्या पतीची मदत करण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनीच महिलेला खांदा देत मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

...म्हणून रेल्वे रुळावर झोपलो, मजुराने सांगितली 'त्या' रात्रीची व्यथा