मुंबई : नागरिकांना पॅन कार्ड लवकरात लवकर मिळावं यासाठी आयकर विभागानं एक नवीन सुविधा सुरू केलीय. यानुसार नागरिकांना त्यांच्या आधार कार्डाद्वारे झटपट ई-पॅन कार्ड देण्यात येईल. नुकतीच आयकर विभागानं ही खुशखबरी दिलीय. ही सुविधा नि:शुल्क असेल. यामुळे नागरिकांचा पैसा, वेळ आणि त्रासही वाचणार आहे.
वैध आधार कार्ड धारकांसाठी सीमित वेळेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येत लोक आपल्या वित्तीय आणि कर बाबींसाठी नवीन 'पॅन कार्डा'साठी अर्ज करत आहेत. ही संख्या पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.
या सुविधेअंतर्गत अर्जदारांना आधारशी निगडीत मोबाईल क्रमांकावर 'ओटीपी' पाठवला जातो... आणि त्याच आधारावर नवीन पॅन कार्ड देण्यात येतं. ही पॅन सुविधा केवळ व्यक्तिगत स्वरुपात अर्ज करणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असेल.
# ई - पॅन मिळवण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या पोर्टलवर लॉग इन करून ई-पॅनसाठी अर्ज करायचा आहे. यावेळी तुम्हाला केवळ आधार क्रमांकावर ई-पॅन मिळेल. त्यासाठी इतर कागदपत्रांचीही आवश्यकता भासणार नाही
# आधारशी निगडीत क्रमांकावर 'ओटीपी' आल्यानंतर तुम्हाला ई-केवायसीही पूर्ण करता येईल
# तुम्हाला केवळ एका साध्या कागदावर सही करून त्याची एक स्कॅन कॉपी वेबसाईटवर अपलोड करावी लागेल
# त्यानंतर तुम्हाला १५ अंकांचा एक ओळख क्रमांक तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या रजिस्टर्ड ई-मेलवर येईल
# महत्त्वाचं म्हणजे, कंपन्या, ट्रस्ट किंवा एखाद्या संस्थेसाठी ही सुविधा उपलब्ध नाही