सरकारच्या योजनेमुळे मोफत वीज, असा घ्या फायदा

कोळशाचा तुटवडा असतानाही सरकारची नवी योजना 

Updated: Dec 10, 2021, 02:10 PM IST
सरकारच्या योजनेमुळे मोफत वीज, असा घ्या फायदा  title=

मुंबई : देशभरात विजेच्या वाढत्या दरांमुळे सामान्य हैराण झाले आहेत. भारतात विजेच्या निर्माणाकरता मोठ्या प्रमाणावर कोळश्याचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच देशात कोळशाचा तुटवडा असल्याची बातमी आली होती. अशावेळी सरकार देशवासियांकरता मोठी योजना घेऊन आले आहे. ज्यामुळे नागरिकांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. 

सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाची योजना 

'सोलर रुफटॉप सबसिडी स्कीम' असे या योजनेचे नाव आहे. देशातील सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना भारत सरकार चालवत आहे. सोलर रूफटॉप योजनेद्वारे केंद्र सरकार देशात कधीही न संपणारी ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देते. यासाठी केंद्र सरकार ग्राहकांना सोलर रूफटॉप बसविण्यावर अनुदान देते.

20 वर्षांपर्यंत मिळणार फ्री वीज 

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवून विजेचा खर्च ३० ते ५० टक्क्यांनी कमी करू शकता. सोलर रूफटॉप 25 वर्षांसाठी वीज पुरवेल आणि या योजनेतील खर्च 5-6 वर्षात दिला जाईल. यानंतर तुम्हाला पुढील १९-२० वर्षे सौरऊर्जेवरील मोफत विजेचा लाभ मिळेल.

सरकार देणार सबसिडी 

ही योजना भारत सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केली आहे. 3KW पर्यंत सौर रूफटॉप पॅनेल स्थापित करण्यासाठी, तुम्हाला सरकारकडून 40% पर्यंत सबसिडी मिळेल. त्याच वेळी, 3KW नंतर केंद्र सरकारकडून तुम्हाला 10KW पर्यंत 20 टक्के सबसिडी दिली जाईल.

सोरल पॅनल लावण्यासाठी लागणार इतकी जागा 

सोलर पॅनल बसवण्यासाठी जास्त जागेची गरज नाही. तुम्ही ते तुमच्या घराच्या किंवा कारखान्याच्या छतावर लावू शकता. 1KW सौर उर्जेसाठी 10 चौरस मीटर जागा आवश्यक आहे. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी, तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही mnre.gov.in ला भेट देऊ शकता.