मोदींनी ध्यान केलेल्या गुहेत तुम्हालाही राहायचेय? जाणून घ्या एका दिवसाचे भाडे

पर्यटकांना या गुहेमध्ये राहायचे असल्यास दिवसाला ९९० रुपये इतके भाडे मोजावे लागेल.

Updated: May 20, 2019, 07:52 AM IST
मोदींनी ध्यान केलेल्या गुहेत तुम्हालाही राहायचेय? जाणून घ्या एका दिवसाचे भाडे title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला केदारनाथ दौरा चांगलाच गाजला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराच्या परिसरातील एका गुफेत ध्यानधारणा केली होती. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. बऱ्यावाईट चर्चेमुळे मोदी ध्यानधारणा करण्यासाठी ज्या गुहेमध्ये बसले होते, त्याविषयीही अनेकांची उत्सुकता वाढली होती. या सगळ्यानंतर ध्यानधारणेसाठी विशेषरित्या विकसित करण्यात आलेल्या या गुहेचा तपशील समोर आला आहे. त्यानुसार सामान्य पर्यटकही आपल्या सोयीप्रमाणे ही गुहा भाड्याने घेऊ शकतात. पर्यटकांना या गुहेमध्ये राहायचे असल्यास दिवसाला ९९० रुपये इतके भाडे मोजावे लागेल. याठिकाणी जेवण आणि फोन यासारख्या सुविधाही दिल्या जातात. 

गढवाल मंडल विकास निगमतर्फे (जीएमव्हीएन) गेल्यावर्षीपासून केदारनाथ येथे या गुहेची सोय करून देण्यात आली होती. केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अशाप्रकारे गुहा तयार करण्याची कल्पना सुचविली होती. सुरूवातीला या गुहेत राहण्याचे एका दिवसाचे भाडे ३००० रूपये इतके होते. मात्र, पर्यटकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता हे भाडे ९९० रूपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. 

येथील वातावरण प्रचंड थंड असल्याने आणि भाडे खूपच जास्त होते. तसेच सुरुवातीला ही गुहा किमान तीन दिवसांसाठी भाड्याने घेण्याची अट होती. त्यामुळे पर्यटक याठिकाणी फारसे फिरकत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर 'जीएमव्हीएन'कडून आपल्या धोरणात बदल करण्यात आल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार आता ही गुहा फक्त एका दिवसासाठीही भाड्याने घेता येऊ शकते. 

या गुहेत पर्यटकांना लाईट, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह अशा प्राथमिक सुविधा पुरवल्या जातात. तसेच पर्यटकांच्या गरजेनुसार दिवसातून दोन वेळा नाश्ता आणि जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. ही गुहा केवळ ध्यानधारणेसाठी विकसित करण्यात आल्याने याठिकाणी फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जातो. जेणेकरून पर्यटकांना एकांत मिळेल. मात्र, अगदीच मदतीची गरज पडली तर संपर्क साधण्यासाठी याठिकाणी फोनचीही सोय उपलब्ध आहे.