एक्झिट पोल चुकीचे, अंतिम निकालांची वाट पाहू- शशी थरुर

त्यांनी  हे एक्झिट पोल स्पष्टपणे नाकारले आहेत. 

Updated: May 20, 2019, 07:38 AM IST
एक्झिट पोल चुकीचे, अंतिम निकालांची वाट पाहू- शशी थरुर  title=

नवी दिल्ली : विरोधी पक्षांना जबर धक्का देत रविवारी लोकसभा निवडणूक २०१९ चे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर हे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारलाच जनतेचा कौल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पुन्हा एकदा देशात मोदी सरकारच सत्तेत येणार असल्याची चिन्हं या एक्झिट पोलमधून देण्यात आली. विरोधी पक्षांना दणका देणाऱ्या याच एक्झिट पोलविषयी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आपली प्रतिक्रिया देत हे एक्झिट पोल स्पष्टपणे नाकारले आहेत. निवडणुकांच्या अंतिम निकालांची वाट पाहण्याचं म्हणत त्यांनी ट्विट केलं. 

'माझ्या मते एक्झिट पोल हे चुकीचे आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले होते' भारताचं म्हणाल तर, इथे जनता मोठ्या प्रमाणावर सत्य सांगण्यापासून दूर राहते म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. एक्झिट पोलचे सर्व अंदाज धुडकावून लावत थरुर यांनी आपण निवडणुकांच्या अंतिम आणि तितक्याच खऱ्या निकालांची वाट पाहू, असं त्यांनी स्पष्ट केलं.  

थरुर यांनी अंतिम निकालांपर्यंत प्रतिक्षा करु असं म्हटलं असलं तरीही, एक्झिट पोलनंतर भाजपच्या गोटात आणि समर्थकांमध्येही सध्या काहीसं सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. टाइम्स नाऊ- व्हीएमआरच्या एक्झिट पोलमध्ये सांगितल्यानुसार एकूण ५४२ पैकी भाजपप्रणित एनडीएला ३०६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला १३२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. एबीपी – नेल्सनच्या एक्झिट पोलमध्ये आलेल्या निर्णयानुसार भाजपप्रणित एनडीएला २६७, काँग्रेसप्रणित यूपीएला १२७, समाजवादी आणि बहुजन समाजवादी पार्टीला ५६ आणि अन्य पक्षांना ८४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ही लढत रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. बरेच दिग्गज आणि नवी पिढी निवडणुकांच्या रिंगणात उतरल्यामुळे आता लक्ष लागलं आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या अंतिम निर्णयाकडे.