कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर आलेत.

Updated: Jan 20, 2019, 04:47 PM IST
कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी title=

बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर आलेत. बंगळुरूच्या इगल्टन रिसॉर्टमध्ये दोन आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. विजयानगरचे आमदार आनंद सिंग आणि कॅम्पीचे आमदार जे.एन. गणेश एकमेकांना भिडले. यात आनंद सिंग जखमी झाले असून त्यांना बंगळुरूमधल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शुक्रवारी झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारली होती. त्यानंतर आणखी फाटाफुट टाळण्यासाठी काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांना रिसॉर्टवर ठेवलंय. यावेळी आनंद सिंग आणि गणेश यांच्यात वाद झाला आणि मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली.

भाजपच्या जवळीकतेवरून आमदारांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी आमदार जे.एन.गणेश यांनी आमदार आनंद सिंग यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या हल्ल्यामध्ये आमदार आनंद सिंग जखमी झाले आहेत. आनंद सिंग यांना उपचारासाठी बंगळुरूच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं. माध्यमांकडूनच मला ही बातमी कळत आहे. काल रात्री ८ वाजेपर्यंत मी रिसॉर्टमध्ये होतो, असं परमेश्वर यांनी सांगितलं. तसंच याबाबत मला माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्की सांगेन, अशी प्रतिक्रिया परमेशवर यांनी दिली.

तर कर्नाटक सरकारमधील मंत्री काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी अशी कोणतीही हाणामारी झाली नसल्याचं सांगितलं आहे. ही बातमी खोटी आहे. तुम्ही सगळ्या आमदारांना एकत्र येताना आणि परत जाताना बघितलंत. काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असं शिवकुमार म्हणाले. बैठकीला जे काँग्रेस आमदार आले नाहीत, तेही काँग्रेससोबतच येतील, असा विश्वासही शिवकुमार यांनी व्यक्त केला. 

कर्नाटकमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या विधीमंडळ बैठकीला चार आमदारांनी दांडी मारली. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून काँग्रस-जेडीएसचं कर्नाटकमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप होतोय. पण मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सगळे आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा केला होता. यानंतर काँग्रेस आणि जेडीएसनं आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला आमदारांनी दांडी मारल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश जारकिहोली, बी. नागेंद्र, उमेश जाधव आणि महेश कुमाठल्ली हे चार आमदार बैठकीला आले नाहीत. या सगळ्या घडामोडीनंतर काँग्रेसनं त्यांच्या आमदारांना बंगळुरूमधल्या रिसॉर्टवर ठेवलं आहे. पण या रिसॉर्टमध्येच काँग्रेसचे दोन आमदार एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. सध्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी भाजपचे १०४, काँग्रेसचे ८० तर जेडीएसचे ३७ आमदार आहेत. बसपा, केपीजेपी आणि अपक्ष असे प्रत्येकी एक आमदार आहे.

काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका

कर्नाटकमधल्या या नाट्यमय घडामोडींवरून काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीका केली आहे. कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि अनेक केंद्रीय नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजपकडून आमच्या आमदारांना ५०-७० कोटी रुपयांनी ऑफर देण्यात आली आहे. याचे आमच्याकडे पुरावेही असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे.

देशाच्या चौकीदाराकडे एवढे पैसे कुठून आले? असा सवालही सिद्धरामय्या यांनी केलाय. तसंच बैठकीला गैरहजर असलेल्या चारही आमदारांनी काँग्रेसनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सगळ्या आमदारांवर पक्षद्रोही विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही सिद्धरामय्या यांनी दिला आहे.