'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही....', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन

बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही.   

शिवराज यादव | Updated: Dec 8, 2023, 04:28 PM IST
'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही....', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन title=

बिहारच्या गोपालगंज येथील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या मृत्यूमुळे नैराश्यात गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांनी ट्रेनसमोर उडी मारुन आपलं जीवन संपवलं. कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आत्महत्या करणाऱ्या पित्यासह त्याची 2 तरुण मुलं होती. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामसूरत महतो यांची मुलगी सुभावती कुमारीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. आजारपणामुळे तिने जीव गमावला होता. यामुळे संपूर्ण कुटुंब नैराश्यात गेलं होतं. याच नैराश्यात रामसूरत महतो यांनी आपली मुलं सचिन आणि दीपक यांच्यासह चंदन टोलाजवळील थावे-थपरा पॅसेंजर ट्रेनसमोर उडी मारुन जीवन संपवलं. गावाचे प्रमुख, सरपंच आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आजारपणामुळे रामसूरत यांचं कुटुंब फार चिंतित होतं. मुलीला लकवा आल्याने रामसूरत यांनी तिच्या उपचारासाठी सर्व काही पणाला लावलं होतं. 

रामसूरत यांच्या कुटुंबात आता कोणीच वाचलेलं नाही, जो या आत्महत्येचं नेमकं कारण सांगू शकेल. कारण पत्नीचा आधीच आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. एक मुलगा दिव्यांग असून, दुसरा सूरतमध्ये काम करत होता, ज्याच्यावर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी होती. संपूर्ण गावात या घटनेची चर्चा आहे. रामसूरत नेहमी गावकऱ्यांना सांगायचे की, ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल, तेव्हा आम्हीही या जगात राहणार नाही. 

स्थानिक ग्रामस्थ कंचन कुमार यांनी सांगितलं आहे की, तीन दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह अद्यापही घरातच पडला आहे. याच दु:खातून पिता आणि दोन्ही मुलांनी आत्महत्या केली. त्यांची मुलगा आणि मुलगा दिव्यांग होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.