... म्हणून महिलांच्या शर्टाच्या डाव्या बाजूला असतात बटणं, जाणून वाटेल आश्चर्य

आजकाल कपडे आणि चष्मा व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या महिला आणि पुरुषांसाठी समान आहेत.

Updated: Jun 14, 2022, 09:45 PM IST
... म्हणून महिलांच्या शर्टाच्या डाव्या बाजूला असतात बटणं, जाणून वाटेल आश्चर्य title=

मुंबई : सध्या युनिसेक्सचे युग सुरु आहे. युनिसेक्स म्हणजे काय तर, स्त्री आणि पुरुष दोघांनी वापरु शकत असलेली गोष्ट. आता जगात स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकत्र काम करतात. एकसारखं काम करतात. त्यामुळे दोघांमध्ये कोणीही मागे नाही. मग कपडे आणि वस्तु वापरण्यात तरी कसे काय मागे राहातील? यामुळेच तर युनीसेक्स वस्तु सध्या ट्रेंड होऊ लागल्या आहेत.

आता पॅट आणि शर्टचंच घ्या ना. पुरुष आणि स्त्रिया दोघेही ते परिधान करतात. आजकाल कपडे आणि चष्मा व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या महिला आणि पुरुषांसाठी समान आहेत.

पूर्वी फक्त पुरुषच शर्ट घालायचे, पण आता महिलाही शर्ट घालू लागल्या आहेत. फॅशनच्या या युगात बरेच काही बदलले आहे. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या अजूनही तशाच आहेत. हे तुम्हाला महिला आणि पुरुष दोघांच्या शर्टाच्या डिझाइनवरुन जाणवेल.

तुम्ही जर नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटणे असतात, तर महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे असतात. हे फॅशनसाठी केले जात नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला ती कारणं जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत. 

पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटणे असतात
खरे तर पूर्वीच्या काळी पुरुष तलवार उजव्या बाजूला ठेवत असत. जेव्हा त्याला शर्टची बटणे काढायची किंवा लावायची तेव्हा तो डाव्या हाताचा वापर करायचा. जर शर्टची बटणे डाव्या हाताने उघडायची असतील, तर शर्टची बटणे उजव्या बाजूला असावीत.

महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे असतात
खरंतर स्त्रिया आपल्या लहान मुलाला डाव्या बाजूला धरतात. त्यामुळे शर्टाचे बटण काढण्यासाठी त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागतो. उजव्या हाताने बटण उघडण्यासाठी, बटण डावीकडे असले पाहिजे. म्हणूनच महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे असतात.

आणखी एक अहवाल समोर

असे म्हटले जाते की, नेपोलियन बोनापार्टने महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला लावण्याचा आदेश दिला होता. नेपोलियन नेहमी त्याच्या शर्टमध्ये एक हात ठेवत असे. स्त्रिया नेपोलियनचे अनुकरण करू लागल्या. म्हणूनच नेपोलियनने स्त्रियांच्या शर्टला डावीकडे बटणे लावण्याचा आदेश दिला. मात्र, याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

या गोष्टीही आहेत कारणीभूत

पूर्वी स्त्रिया दोन्ही पाय शेजारी ठेवून सायकल किंवा दुचाकीवर प्रवास करत असत, असे म्हणतात. शर्टच्या डाव्या बाजूला बटणे असल्याने त्यांना खूप मदत झाली. महिलांच्या शर्टला उजव्या बाजूला बटण लावले, तर वाऱ्यामुळे त्यांचा शर्ट पुन्हा पुन्हा उघडायचा, त्यामुळे त्यांना लाज वाटायची. ज्यामुळे ते डाव्या बाजूलाच लावले गेले.

फॅशन हे देखील एक कारण

काही लोक म्हणतात की, महिलांच्या शर्टला वेगवेगळ्या ठिकाणी बटणे लावण्याचे एकमेव कारण म्हणजे महिला आणि पुरुषांच्या कपड्यांमध्ये फरक आहे.