साप चावला म्हणून त्यानं चावून सापाचे तुकडे - तुकडे केले

पापाचं प्रायश्चित म्हणून राजकुमारच्या गरीब कुटुंबानं आणि ग्रामस्थांनी सापावर यथोचित अंत्यसंस्कार केले

Updated: Jul 30, 2019, 11:03 AM IST
साप चावला म्हणून त्यानं चावून सापाचे तुकडे - तुकडे केले title=

इटा, उत्तर प्रदेश : साप चावला म्हणून तो सापाला चावला... वाचून धक्का बसला ना?. पण हे प्रत्यक्षात घडलंय उत्तर प्रदेशमध्ये... त्याचं झालं असं की उत्तर प्रदेशातल्या इटामध्ये राजकुमार नावाचा तरुण आपल्या घरात मद्यपान करत होता. एवढ्यात कुठूनसा एक साप आला आणि त्याला चावला... त्यामुळे राजकुमार भडकला. रागाच्या भरात त्यानं त्या सापाला पडला आणि चावून चावून त्याचे तुकडे केले. 

रविवारी रात्री इटा जिल्ह्यातल्या असरौली गावात ही घटना घडलीय. 'माझ्या मुलानं सापाला पकडलं आणि त्याचे चावून चावून तुकडे केले... मुलाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे' असं राजकुमारचे वडील बाबू राम यांनी म्हटलंय. 

हा प्रकार पाहून डॉक्टर एन. पी. सिंग हेदेखील अचंबित झालेत. कारण साप चावलेल्या शेकडो लोकांवर त्यांनी उपचार केले असले तरी सापाला चावलेल्या रुग्णावर उपचार करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती.

आता राजकुमारवर उपचार सुरू आहेत. तो अत्यवस्थ आहे ते साप त्याला चावल्यामुळे की तो सापाला चावल्यामुळे, हे कळायला मार्ग नाही... 

सापानं मात्र जगाचा निरोप घेतलाय. आपल्या मुलानं सापाला मारून केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणून राजकुमारच्या गरीब कुटुंबानं आणि ग्रामस्थांनी सापावर यथोचित अंत्यसंस्कार केले आहेत.